मुंबई | Mumbai
देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान (Voting) पार पडले आहे. पंरतु, काही ठिकाणी ईव्हीएम (EVM) मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र, अशातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्याकडे एका व्यक्तीने ईव्हीएम मशीन हॅक करून देतो, असे म्हणत अडीच कोटींची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा : आमदार दत्तात्रय भरणेंकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काम करणाऱ्याला शिवीगाळ? रोहित पवारांकडून व्हिडिओ पोस्ट
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीचे नाव मारुती ढाकणे असे असून तो लष्करातील जवान आहे. सध्या तो जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) नियुक्तीवर आहे. ढाकणे हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. या व्यक्तीने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) लोकसभा मतदारसंघात वापरण्यात येणारे सगळे ईव्हीएम मशीन हॅक करुन पाहिजे तसा निकाल लावून देतो,असे म्हणत त्या बदल्यात पैसे हवेत अशी मागणी केल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अचानक अजितदादांच्या घरी; नेमकी काय चर्चा झाली?
त्यानंतर दानवे यांनी आपल्या भावाकडून संबधित व्यक्तीला पैसे देतो असे सांगून पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. यानंतर दानवे यांचे भाऊ एक लाख रुपये देण्यासाठी ढाकणे याच्या भेटीला एका हॉटेलमध्ये गेले असता सोबत असलेल्या पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी संशयिताची विचारपूस केली असता त्याने कर्जबाजारी असल्याने आपल्याला ही कल्पना सुचली असे म्हणत हा प्रयत्न केल्याचे म्हटले. तसेच या कामासाठी ढाकणे याच्याकडे काही आक्षेपार्ह गोष्टी देखील आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.