अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
वाटेफळ (ता. अहिल्यानगर) येथील सर्विस रस्त्यावरील बस स्थानकावर रविवारी (27 एप्रिल) सायंकाळी 7:30 च्या सुमारास दोघा भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात लोखंडी रॉड, गज, लाकडी दांडके व दगडांचा वापर करण्यात आला असून, सोन्याची अंगठी काढून घेत मोबाईल फोडल्याचीही घटना घडली आहे. याप्रकरणी नऊ जणांविरोधात खुनाचा प्रयत्न व अन्य कलमान्वये अहिल्यानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत बापू चौधरी (वय 22, रा. कुंटेफळ, ता. आष्टी, जि. बीड) यांनी फिर्याद दाखल केली असून, त्यांच्यासह त्यांचे चुलत भाऊ भाऊसाहेब चौधरी हल्ल्यात जखमी झाले आहेत. नारायण कोळेकर, बाळासाहेब कोळेकर, सोमनाथ चितळकर, सुशील चितळकर, सोन्या उल्हारे, धरम महानोर, अजय साबळे, दुर्गेश साबळे, नारायण कोळेकर याची पत्नी (नाव माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी सायंकाळी वाटेफळ येथील सर्विस रस्त्यावरील बस स्थानकावर फिर्यादी प्रशांत चौधरी व त्यांचे भाऊ भाऊसाहेब हे दोघे मित्र दीपक कराळे यांची वाट पाहत उभे होते. लघुशंकेसाठी फिर्यादी आडोशाला गेले असता, संशयित आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वेदांत चौधरी व दीपक कराळे यांनी प्रशांत यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. तसेच प्रशांतच्या हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली आणि मोबाईल फोडून नुकसान करण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अहिल्यानगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पतंगे अधिक तपास करीत आहेत.