घोटी | जाकीर शेख
इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणात दोन जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेमुळे सांजेगाव परिसरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. अनिल भागुजी भदादे (वय ४९) आणि तुकाराम दामू येले (वय ४७) अशी बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत. दिवाळीच्या सणाच्या आनंदावर या घटनेने विरजण पडले असून, दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दोघेही मुकणे धरण परिसरात पोहोण्यासाठी गेले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. यावेळी धरणाच्या काठावर त्यांचे कपडे व काही वस्तू आढळून आल्याने ते पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याबाबत तातडीने वाडीवऱ्हे पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार हिरामन खोसकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच सुरू असलेल्या शोधकार्याची माहिती घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अनुभवी पाणबुड्यांच्या मदतीने धरणाच्या पाण्यात दोघांचा शोध घेण्यात आला.
शुक्रवारी सकाळपासून पाणबुड्यांनी दिवसभर धरणाच्या पाण्यात शोधमोहीम राबविली. मात्र, अथक प्रयत्न करूनही सायंकाळपर्यंत दोघांचा शोध लागला नाही. संध्याकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र, अंधार पडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव शोधमोहीम थांबविण्यात आली. दोघेही अद्याप बेपत्ता असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात घडलेल्या या घटनेने सांजेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. दोन्ही बेपत्ता व्यक्तींचा शोध लागावा, यासाठी नागरिकांकडून प्रार्थना केली जात आहे.




