Monday, August 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAccident : पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Accident : पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पेठ | प्रतिनिधी Peth

- Advertisement -

पेठ – नाशिक महामार्गावरील हॉटेल ऋषीकेशसमोर पिकअप आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात हरेष भिमा किरकिरे (२६, रा. पेठ) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पुष्पराज मधूकर झुंझुर्टे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे पेठ शहरावर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पेठ शहरातील काही युवक रात्री जेवणासाठी महामार्गावरील ‘हॉटेल ऋषीकेश’ येथे गेले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास जेवण आटोपून ते त्यांच्या दुचाकीने (क्रमांक एमएच १५ जेओ २५४४) पेठ शहराकडे परत येत होते. त्याच वेळी गुजरातकडून भाजीपाला खाली करून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या पिकअप वाहनाने (क्रमांक एमएच १४ एमटी ३५४६) दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वेगात असलेली पिकअप रस्त्यावरच पलटी झाली.

या अपघातात दुचाकीस्वार हरेष किरकिरे हा पलटी झालेल्या पिकअपखाली अडकला, तर त्याचा सोबती पुष्पराज झुंझुर्टे हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने दोघांनाही पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले. दुर्दैवाने, नाशिक येथे उपचारापूर्वीच हरेष किरकिरे याचा मृत्यू झाला.

मृत हरेष किरकिरे याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. त्याच्या पश्चात ८ महिन्यांचे लहान मूल आणि कुटुंब असून, घरातील कमावत्या व्यक्तीचा अचानक अंत झाल्याने कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. या अपघाताबाबत पोलीस ठाण्यात अद्याप अधिकृत गुन्ह्याची नोंद झाली नसली, तरी पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...