Wednesday, September 9, 2026
Homeराजकीय"जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या..."; उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

“जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या…”; उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

मुंबई । Mumbai

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा १२ वा दिवस उजाडला असतानाच, आता आंदोलनकर्ते आणि सरकारमधील राजकीय संघर्ष कमालीचा पेटला आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह महायुती सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली होती.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये तातडीची पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. “आम्ही आंदोलनाच्या दिशेने ४ पावले नाही तर ५०० किलोमीटर पुढे आलो आहोत, पण आमच्या नेत्यांबद्दल एकेरी व आक्षेपार्ह भाषा वापरली तर कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जातील,” असा थेट इशाराच मंत्री सामंत यांनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत यांनी सरकारची बाजू स्पष्टपणे मांडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासन आणि आरक्षण समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. “मराठवाड्यात आतापर्यंत २१ हजार ५१ जात प्रमाणपत्रांची अत्यंत पारदर्शकपणे पडताळणी झाली असून, त्यापैकी १६,११० दाखले वितरीत करण्यात आले आहेत. केवळ २ हजार अर्ज प्रलंबित असून तेही लवकरच मार्गी लावू. त्यामुळे सरकारकडून चुकीच्या पद्धतीने काम होत असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. या निर्णयाचा ओबीसी आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही,” असे सामंत यांनी ठामपणे नमूद केले.

जरांगे पाटलांकडून एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांचा होणारा एकेरी उल्लेख आणि टीकेवर सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “मनोज दादांचे लाखो समर्थक आहेत, तसे आमच्या नेत्यांचेही राज्यभरात लाखो कार्यकर्ते आहेत. नेत्यांना विनाकारण लक्ष्य केले तर कार्यकर्त्यांमध्ये चिडचिड होणे स्वाभाविक आहे. जरांगे यांना कोणीतरी जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन भडकवत आहे. उपोषणामुळे त्यांची चिडचिड होत असावी, मात्र आम्ही संयमाने उत्तर देत आहोत. संयम ही आमची ताकद असली तरी प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे,” असा इशारा त्यांनी दिला.

सध्या मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असून उद्या बेंदूर-पोळा हा महत्त्वाचा सण आहे. पाठोपाठ गणेशोत्सवही सुरू होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि आंदोलनाला तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी नम्र विनंती सरकारने केली आहे. “आम्ही चर्चेसाठी अभ्यासक पाठवण्यास तयार आहोत. दंगल घडवणे हा आमचा हेतू नाही आणि ते पाप आम्ही कधीच करणार नाही,” असे स्पष्ट करत सामंत यांनी संवादाचा मार्ग खुला असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.

ताज्या बातम्या