मुंबई । Mumbai
राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर रद्द केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या वतीने ५ जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार असून, हा राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा क्षण मानला जात आहे. दोन्ही नेत्यांनी त्रिभाषा धोरणाला विरोध केला होता, आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने हा मेळावा उत्साहात साजरा होणार आहे.या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, भाजप खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
राणे यांनी एका पोस्टमध्ये म्हटले की, उद्धव ठाकरे आता राज ठाकरे यांना जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण याच उद्धव यांनी राज यांना पक्षातून बाहेर काढण्यासाठी त्रास दिला होता. “जो बूंद से गई वो हौद से नहीं आती,” असे म्हणत राणे यांनी ठाकरेंच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांनी राणेंवर जोरदार प्रत्युत्तर दिले.
जाधव यांनी राणेंना खडेबोल सुनावताना म्हटले की, राणेंनी स्वतःच्या राजकीय प्रवासाची उत्तरे महाराष्ट्राला द्यावीत. “राणेंनी स्वतःचा पक्ष का सोडला? काँग्रेस का सोडली? चिपळूणच्या मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांना इशारा का दिला?” असे सवाल जाधव यांनी उपस्थित केले. तसेच, राणे आणि त्यांच्या कुटुंबाची “चोच नेहमी नरकात” असते, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.
जाधव यांनी पुढे सांगितले की, मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच राणेंना त्यांची जागा दाखवली आहे. महाजन यांनी राणेंना “एहसान फरामोश” संबोधत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. “राणेंनी राज ठाकरे किंवा त्यांच्या मुलाबद्दल जे वक्तव्य केले, त्याला महाजन यांनी पुरेसे उत्तर दिले आहे,” असे जाधव म्हणाले.
दरम्यान, राणेंच्या टीकेने राजकीय वातावरण तापले आहे. जाधव यांनी राणेंच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यावरही निशाणा साधला. “राणेंच्या मुलाने माझ्यावर अशोभनीय टीका केली. हा तोच मंत्री आहे जो भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहे,” असे जाधव म्हणाले. त्यांनी राणेंना इतरांची काळजी करण्याऐवजी स्वतःच्या कृतींचा हिशेब देण्याचा सल्ला दिला.हा विजयी मेळावा आणि त्याला जोडलेली राजकीय टीका-टिप्पणी येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा घडवणार आहे. ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची ही संधी राजकीय समीकरणे बदलणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.




