नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीधील घटक पक्षांची बैठक झाली. पण या बैठकीमुळे सध्या उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. भाजपा महाराष्ट्र आणि शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी इंडि आघाडीच्या बैठकीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे महाराष्ट्रातील तिन्ही नेते शेवटच्या रांगेत बसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हा फोटो सत्ताधाऱ्यांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात येत आहे.
इंडिया आघाडीची काल राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आसन व्यवस्थेवरून आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने टोलेबाजी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना बैठकीत अखेरच्या रांगेत बसवण्यात आले असा टोला भाजप शिवसेनेकडून मारण्यात येत आहे. हिंदुत्व, विचारधारा सोडली की पदरात काय पडले? शेवटची रांग? असा टोला केशव उपाध्येंनी मारलाय. तर नरेश म्हस्केंनीही एक्स पोस्टवरून खिल्ली उडवली आहे.
भाजपकडून उध्दव ठाकरेंची खिल्ली उडवली
भाजपा महाराष्ट्राने एक्स साइटवर इंडि आघाडीच्या बैठकीतील एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे शेवटच्या रांगेत बसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपाकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटोला गोल करुन “या फोटोत स्वाभिमान शोधून दाखवा #शेवटची_रांग” असे कॅप्शन देण्यात आले आहे. पण भाजपा महाराष्ट्राने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक नेटकरी भाजपावरच टीका करताना पाहायला मिळत आहेत.
नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी सुद्धा इंडि आघाडीच्या बैठकीतील हे फोटो पोस्ट केले आहेत. त्याशिवाय त्यांनी पोस्ट करत लिहिले आहे की, “आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे… #शिवरायांचा वारसा सांगता ना रे… खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे????” असा टोला म्हस्केंनी कवितेच्या माध्यमातून लगावला आहे. तर, “#बाळासाहेबांनी आम्हाला #आत्मसन्मान #स्वाभिमान शिकवला अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला.. तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे??” असा प्रश्नही म्हस्केंनी उपस्थित केला आहे.
तसेच, “#काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे, आदित्य ठाकरे…. तुमच्यापेक्षा एकेक खासदारवाले पक्ष बरे त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे… #महाराष्ट्राची #दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे… थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा ना रे… महाराष्ट्राची किंमत #कोणी कुठे वाढवली, ते जरा दुसऱ्या फोटोंत बघा रे…..” असे काव्यात्मक टीकास्त्र नरेश म्हस्केंनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून ठाकरे पिता-पुत्रांवर डागले आहे.
केशव उपाध्येंनी काय म्हंटलं आहे?
भाजपासोबत उध्दव ठाकरे होते, तेव्हा किती सन्मान उद्धव ठाकरेंना किती सन्मान होता. देशातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते मातोश्रीवर जाऊन सन्मान करत होते. 2019 लोकसभा निवडणूकीच्यावेळी अमित शाह मातोश्रीवर आले होते. हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली, त्यातून मान गेला, सन्मान गेला… हातात पडलं काय तर…आता तर काय बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग…, असा टोला केशव उपाध्य यांनी लगावला आहे.




