अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
देशभरात वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांचे अहिल्यानगर कनेक्शन समोर आले आहे. अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्याने ‘म्युल अकाउंट’ रॅकेटविरोधात मोठी कारवाई सुरू केली असून, फसवणुकीची रक्कम स्वतःच्या बँक खात्यांमध्ये स्वीकारून ती तात्काळ एटीएम किंवा धनादेशाव्दारे काढणार्या खातेधारकांसह मुख्य सायबर गुन्हेगारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी, राहुरी, श्रीगोंदा तालुक्यातील 12 व्यक्तींचे बँक खात्यांवर फसवणुकीची रक्कम प्राप्त झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल आव्हाड यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, ऑनलाईन गुंतवणूक योजना, पार्ट-टाईम जॉब ऑफर, डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटमधील जादा परताव्याचे आमिष, तसेच सीबीआय, न्यायालय किंवा इतर सरकारी कार्यालयांचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. सायबर गुन्हेगार अत्यंत संघटित पध्दतीने काम करत असून, ते स्वतःच्या बँक खात्यांचा वापर न करता सामान्य नागरिकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती भाड्याने घेतात किंवा विकत घेतात. अशा खात्यांना ‘म्युल अकाउंट’ म्हटले जाते. फसवणुकीतून मिळालेली रक्कम प्रथम या खात्यांमध्ये जमा केली जाते आणि त्यानंतर ती तात्काळ एटीएम किंवा धनादेशाव्दारे काढून घेतली जाते. त्यामुळे पैशांचा डिजिटल मागोवा खंडित होऊन मुख्य आरोपींपर्यंत पोहोचणे कठीण होते.
सायबर पोलिसांनी गृह मंत्रालयाच्या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांच्याकडून उपलब्ध झालेल्या माहितीचे विश्लेषण केले. त्यामध्ये अहिल्यानगर सायबर पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील काही बँक खात्यांमध्ये देशभरातील विविध सायबर फसवणुकीतील सुमारे 40 लाख 68 हजार रूपयांची रक्कम जमा झाल्यानंतर ती तातडीने एटीएम किंवा धनादेशाव्दारे काढून घेतल्याचे स्पष्ट झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबरकडून वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि गुन्हेगारांची आर्थिक साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने अशा म्युल अकाउंटचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार अहिल्यानगर सायबर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून संबंधित बँक खात्यांचा, व्यवहारांचा तसेच रक्कम काढणार्या व्यक्तींचा सखोल तपास सुरू केला आहे.
कमिशनचे आमिष
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या कमिशनच्या मोबदल्यात स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक किंवा इंटरनेट बँकिंगची माहिती इतरांना देऊ नये, अन्यथा तेही सायबर गुन्ह्यात आरोपी ठरू शकतात, असा इशाराही सायबर पोलिसांनी दिला आहे.
संघटित पध्दतीने फसवणूक
सायबर पोलिसांच्या तपासात संबंधित खातेधारकांना त्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम ही सायबर फसवणुकीची असल्याची माहिती असूनही त्यांनी आर्थिक फायद्यासाठी ती स्वीकारून काढल्याचे निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे हे खातेधारक, खाती हाताळणारे इसम तसेच मुख्य सायबर गुन्हेगार यांनी संगनमत करून संघटित पध्दतीने नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.




