मुंबई | Mumbai
प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूर येथे शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीकरा या मागणीसाठी रस्त्यावर ठिय्या मांडला. या आंदोलनाची दखल घेत कडू आणि इतर शेतकरी नेत्यांसोबत राज्य सरकारने बैठक आयोजित केली. त्यात ३० जून २०२६ पर्यंत शेतकरी कर्जमाफी जाहीर करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करण्यात आल्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, तूर्तास तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नसली तरी बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतले आहे. मात्र आता राज्य सरकारच्या या निर्णयावर उध्दव ठाकरे यांनी टीका केली आहे.
शेतकऱ्यांना न झुलवता कर्जमुक्त करा!
उद्धव ठाकरे यांनी पत्रक काढत म्हटलेय की “शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा!, कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. निसर्ग कोपलाच आहे. त्यात संवेदना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभारः अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे त्यातून पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतील काय? शेतकऱ्यांची दैनावस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमका कसला अभ्यास करून अहवाल देणार? पुढच्या वर्षी जूनमध्ये जर खरंच कर्जमाफी होणार असेल तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे का? पुढील वर्षी जुनच्या कर्जमाफीत हे हप्ते माफ होणार असतील तर ते का भरायचे? ते न भरता शेतकऱ्यांना रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे का? जर नव्याने कर्ज मिळणार असेल तर ते देखील माफ होणार का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे
“इतर मदत करण्याआधी खरडून गेलेली जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी माती मागतो आहे. पण त्याविषयी सरकार काहीच करायला तयार नाही. जगाचे पोट भरणारा शेतकरी आज भयंकर संकटात सापडला आहे. पाऊस अजूनही शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. सरकारने हजारो कोटींच्या नुकसानभरपाईची घोषणा केली, पण शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पैसे जमा झाले हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात सहा महिन्यांपासून पाऊस पडतो. शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. कर्जमुक्ती देण्याची यापेक्षा आणखी ‘योग्य वेळ’ कोणती असू शकते? तरीही योग्य वेळ आल्यावर कर्जमुक्ती देऊ असे सांगून सरकारने जो वेळकाढूपणा चालवला आहे, ती शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
जूनचा गुळ शेतकऱ्यांच्या कोपराला लावला आहे
दरम्यान, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून सातत्याने शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. आत्महत्यांचे हे वाढते आकडे सरकारच्या कानावर आदळत नाहीत काय? तरीही सरकारने कर्जमुक्तीसाठी पुढच्या वर्षी जूनचा मुहूर्त काढावा, हे चीड आणणारे व शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. कर्जमुक्तीसाठी चालढकल करून हे सरकार शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ढकलत आहे. जूनपर्यंत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार आहे काय? सरकार शेतकऱ्यांना केवळ खेळवत आहे. थोडक्यात शेतकऱ्यांच्या आत्ताच्या हालअपेष्टा तशाच राहणार, पुढच्च्या जूनचा गुळ सरकारने शेतकऱ्यांच्या कोपराला लावला आहे. आत्ता आवाज करायचा नाही, असेच बहुदा सरकारला सांगायचे असावे. शेतकऱ्यांना फसवण्याचे हे खेळ बंद करा आणि अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा, असे आम्ही मायबाप सरकारला शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून सांगत आहोत असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




