Saturday, April 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: "खचू नका, वेडवाकडं पाऊल उचलू नका"; उध्दव ठाकरेंची शेतकऱ्यांना साद,...

Uddhav Thackeray: “खचू नका, वेडवाकडं पाऊल उचलू नका”; उध्दव ठाकरेंची शेतकऱ्यांना साद, म्हणाले, “आपला आवाज…”

धाराशिव | Dharashiv
मराठवाड्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटामुळे जालना, लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांमधील हजारो हेक्टरी जमीन पाण्याखाली गेल्याने प्रत्येकी शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने कोणतेही निकष न लावता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी आणि सोबतच विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अनेक शेतकरी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडत आहेत. तसेच आम्हाला सरकारकडून मदत पाहिजे, अशी मागणी करत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी सर्वात प्रथम लातूरमधील काटगावला भेट दिली आणि येथील शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. मराठवाड्यात पहिल्यांदा उलट झाल आहे. पाणीच पाणी झाल आहे. यातून आपल्याला बाहेर पडायला हवे. तुमची मागणी जी आहे कर्जमाफीची ती आहेच. मला त्यात पडायचे नाही. नाहीतर पुन्हा लोक म्हणतील मी राजकारण करतो. आता हे संकट उलट आले आहे. इतक्या वर्षात असे काही झालेले मला तरी आठवत नाही. सरकारने जाहीर केलेली मदत २०२३ च्या निकषांनुसार असून, ती शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

एका शेतकऱ्याने आपले दोन-तीन लाखांचे कर्ज, २० लोकांचे कुटुंब आणि सरकारी नोकरी नसताना मराठा आरक्षणही मिळत नसल्याची व्यथा मांडली. यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना धीर दिला. “तुमचा हात हातात धरणं, एवढंच सध्या आम्ही करू शकतो. आमच्या हातात आता तरी काहीच नाही. पण आम्ही तुमच्यासोबत पूर्ण ताकदीने उभे आहोत. तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवून हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी आणि पूर्ण कर्जमाफीची मागणी सरकारसमोर लावून धरू आणि या मागण्या निश्चितच पूर्ण करून घेऊ,” असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, धीर देण्यासाठी आलो असल्याचे सांगत खचू नका, वेडवाकडं पाऊल उचलू नका, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवतो अशी साद शेतकऱ्यांना घातली. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना निवेदन सुद्धा दिले. उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर धाराशिवसाठी रवाना झाले. लातूरमधील काटगावमध्ये आणि तांदूळजामध्ये उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर साहेब आमची कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी केली.

यावेळी आपल्याला मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पंचनामे करताना अधिकारी आडमुठी भूमिका घेत असतील तर आपण सोबत आहोत, असे सांगत त्यांनी नुकसान पंचनाम्याबाबत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर दिला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या