मुंबई | Mumbai
उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. बाहेर जाण्यास व गर्दीत मिसळण्यापासून काही दिवस दूर राहण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे, अशी माहिती स्वतः राऊत यांनी सोशल मीडियावरून दिली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भांडूप येथील घरी जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी भेट देत त्यांची विचारपूस केली.
संजय राऊत यांच्या प्रकृतीत काही गंभीर समस्या असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाणे, गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नाइलाज असला तरी ठणठणीत बरा होऊन नवीन वर्षात भेटीस येईन, असे संजय राऊत यांनी सोशल मीडियावर म्हटले होते. दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये काय चर्चा झाली या बद्दल खुद्द उध्दव ठाकरे यांनी तपशील सांगितला.
उध्दव ठाकरेंनी काय सांगितलं?
संजय राऊतांशी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, हल्ली रोज संजय राऊत यांना फोन करत नाही. आता रोज सुनील राऊतला संजयच्या प्रकृतीबद्दल विचारण्यासाठी छळत असतो. खूप दिवसांपासून त्यांना भेटायचे होते. आता भेट झाली, चांगले वाटले. संजय खूप फ्रेश दिसले. संजय राऊत लवकरच मैदानात दिसतील. नुसते दिसणार नाहीत तर तलवार घेऊन मैदानात दिसतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याने डॉक्टरांनी त्यांना घराबाहेर न पडण्याची ताकीद दिली होती. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला संजय राऊत यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी संजय राऊत यांच्या तोंडाला मास्क लावलेला होता. शिवाजी पार्कच्या परिसरात गाडीतून उतरल्यानंतर संजय राऊत हे त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात पकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




