Monday, July 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूज…तर देशाच्या भवितव्याची काळजी; उध्दव ठाकरेंचा सरकारवर घाणाघात

…तर देशाच्या भवितव्याची काळजी; उध्दव ठाकरेंचा सरकारवर घाणाघात

मुंबई | Mumbai
विधान परिषदेच्या या निवडणुकीतील उमेदवारीवरून शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाने मविआतील त्यांच्या कोणत्याही मित्रपक्षाशी चर्चा न करता परस्पर चारही जागांवर उमेदवार घोषित केल्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. यावर आज स्वतः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज समाजमाध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले ठाकरे?
“महाविकास आघाडीमध्ये कोणतीही बिघाड नाही. संवाद करताना कनेक्शन लूज झाले. मी निवडणूक झाल्यानंतर बाहेर गेलो होतो. दरम्यानच्या काळात तारखा जवळ आल्या होत्या. त्यामुळे अर्ज भरणे राहू नये म्हणून उमेदवार जाहीर केले. दिल्लीतून फोन आले आहेत, त्यांच्याशी बोलून काही निर्णय होत आहेत,” असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आम्ही कोकण आणि नाशिकच्या जागेबाबत बाबत अग्रही आहोत. याबाबत काँग्रेसचं म्हणणं काय आहे ते दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मला फोन करून सांगितले, जागांबाबत आमच्यात सर्वकाही ठरले आहे. आम्ही काय ठरवलेय ते थोड्याच वेळात तुमच्यासमोर जाहीर करू. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी इथे नव्हतो. अशातच उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ हातची जाऊ नये म्हणून आम्ही चारही जागांवर अर्ज भरले हे खरे आहे. मात्र आता आम्ही चर्चा करून काही वेगळे निर्णय घेतले आहेत. थोड्याच वेळात ते जाहीर केले जातील.”

हे ही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्यांच्या पोस्टने चर्चांना उधाण

या निवडणुकीच्या निमित्ताने अनिल परब यांनी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचं निवडणुकीचे संकल्पपत्र जाहीर केले. यावेळी परब आणि ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. आमचे उमेदवार अनिल परब यांनी आत्ताच त्यांच्या संकल्पपत्राचं लोकार्पण केलं आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ गेल्या पाच टर्मपासून आमच्याकडे आहे. प्रमोद नवलकर यांनी येथून पदवीधरांचं प्रतिनिधीत्व केलं होतं. सुशिक्षित मतदारांचे प्रश्न वेगळे असतात, ते प्रश्न आम्ही गेल्या अनेक दशकांपासून मांडत आलो आहोत, शिवसेनेच्या माध्यमातून पदवीधरांचे प्रश्न सोडवत आलो आहोत. त्यामुळे मी तमाम पदवीधरांना विनंती करतो की तुम्ही मतांच्या रुपाने याआधी आम्हाला आशीर्वाद दिला आहे. आता पुन्हा एकदा मतदान करून आपलं नातं दृढ करा.

मणिपूरवरुन सरकारला टोला
मणिपूरवर १ वर्षाने मोहन भागवत बोलले, मणिपूरबाबत सरसंघचालकांनी जे काही सांगितले त्याला पंतप्रधान गांभीर्याने घेणार आहेत का?, सरसंघचालक बोलल्यानंतर तरी पंतप्रधान मणिपूरला जाणार आहे का? कारण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संघाची आम्हाला गरज राहिली नाही असे जेपी नड्डा म्हणाले होते. सध्या शपथविधी सोहळे सुरू आहेत. काश्मीरात हल्ले होतायेत. त्याकडे सरकार लक्ष देणार आहे की नाही? मला सरकारच्या नाही तर देशाच्या भवितव्याची काळजी आहे. ४०० पार होणारे २४० वर अडकलेत. त्यामुळे मोदी सरकारचं एनडीए सरकार झाले असा टोला ठाकरेंनी लगावला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या