Sunday, July 21, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्यांच्या पोस्टने चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्यांच्या पोस्टने चर्चांना उधाण

मुंबई | Mumbai
देशासह राज्यात लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहे. राज्यात महाविकास आघाडीला मतदारांनी कौल दिला. त्यातही शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली राहिली आहे. १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मात्र यानंतर आता राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळत आहे. वर्धापन दिनाच्या दिवशी रोहित पवार यांनी कोणाचे ही नाव न घेता पक्षात सुरु असलेल्या काही गोष्टींबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात गट पडल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येत आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्या वेळी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विजयाचे श्रेय हे शरद पवार आणि सर्व कार्यकर्त्यांच्या एकत्रित मेहनतीचे फळ असल्याचे सांगितले होते. आपल्या भाषणात रोहित पवार म्हणाले, “पुढील काळात कुणी स्वतःला किंगमेकर म्हणवून घेईल. पण हा विजय कुणा एका नेत्यामुळे झालेला नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्षाला घवघवीत यश मिळाले. तसेच शरद पवार यांनी या वयात ज्या तडफेने प्रचार केला, त्याचेही आपल्याला कौतुक करावे लागेल.”

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि रोहित पवारांचे विश्वासू असणाऱ्या विकास लवांडे यांनी ६ जून रोजी एक पोस्ट लिहीत पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेतृत्वात खांदेपालट करण्यात यावा, अशी मागणी केली होती. “निष्ठावान, लढाऊ नेते शशिकांत शिंदे आणि युवा आमदार रोहित पवार यांच्यावर प्रदेश संघटनेची मुख्य जबाबदारी देण्यात यावी. तसंच राष्ट्रीय पातळीवर सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढवली पाहिजे,” असं लवांडे यांनी म्हटले होते.

विकास लंवाडे यांच्या पोस्टनंतर पक्षाचे प्रवक्ते आणि जयंत पाटील यांच्याशी जवळीक असलेल्या ॲड. भूषण राऊत यांनीही एक पोस्ट टाकून प्रदेशाध्यक्षपदावर दावा करणाऱ्यांना टोला लगावला. “राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोप्प नाहीये…”, असा खरमरीत टोला भूषण राऊत यांनी पक्षांतर्गत विरोधकांना लगावला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात धुसफूस असल्याचे चित्र समोर आले आहे.

पक्षातील अंतर्गत दुफळीबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वर्धापनदिनी भाष्य केले होते. “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार निवडून येणे, हे टीम वर्क आहे. आपल्याला टीम म्हणूनच राहिले पाहिजे. त्यामुळे चुक होत असेल तर कानात सांगा, जाहीररीत्या सांगू नका”, असे म्हणत त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

- Advertisment -

ताज्या बातम्या