Tuesday, February 3, 2026
HomeनगरAhilyanagar : उमेद अभियानात 3 हजार महिला शेतकर्‍यांची ‘क्रांती’

Ahilyanagar : उमेद अभियानात 3 हजार महिला शेतकर्‍यांची ‘क्रांती’

पाच महिला उत्पादक कंपन्यांत मिळणार हजारो नारी शक्तीला रोजगार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून विविध उपक्रमाची सुरुवात होताना दिसत आहे. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाच्यादृष्टीने महत्वाचे पाऊल आहे. शासनाच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून जिल्हाभरामध्ये महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे निर्माण करण्यात अभियानाला यश येत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला शेतकरी संघटित होत असून भविष्यातील शेती संबंधातील विविध आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठ संदर्भातील मूल्यसाखळी विकास करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या महत्वाची भूमिका ठरणार आहेत. नगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पाच महिला उत्पादक कंपन्या आकार घेत असून या ठिकाणी 3 हजार महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प हा महाराष्ट्रातील शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणणारा जागतिक बँक अर्थसहाय्यित प्रकल्प आहे. याचा मुख्य उद्देश लहान शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे, कृषी मूल्य साखळी विकसित करणे आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना सक्षम करून त्यांना बाजाराशी थेट जोडणे आहे. या स्मार्ट अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 5 महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील सुधमूर्ती महिला शेतकरी उत्पादक कंपनी आणि कान्होपात्रा महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून धान्य संकलन प्रतवारी व स्वच्छता केंद्र तसेच आटा मेकिंग करण्यात येणार आहे. नगर तालुक्यातील वत्सुरी महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कांदा साठवणूक गोदामांची उभारणी करण्यात येत आहे. राहुरी येथील आयरा गोल्ड महिला शेतकरी उत्पादक कंपनी व कोपरगाव तालुक्यातील सरोवर महिला शेतकरी उत्पादक कंपनीतून धान्य संकलन प्रतवारी व स्वच्छता केंद्र व डाळ मिल उपक्रम उभारण्याची सुरुवात होत आहे.

2 कोटी पेक्षा अधिक अनुदान
या महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना उपप्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत 60 टक्के अनुदान प्राप्त झाले असून सर्व प्रकल्पांना 2 कोटी पेक्षा अधिक अनुदान टप्प्या टप्प्याने प्राप्त होणार आहे. 40 टक्के निधी हा महिला शेतकर्‍यांनी उभारला आहे. या कंपनीच्या माध्यमातून 3 हजारांपेक्षा अधिक महिला शेतकरी संघटित झालेले आहेत. जिल्ह्यातील महिला या माध्यमातून जिल्हाभरामध्ये स्मार्ट प्रकल्प कामे केली जाणार असून यामधून ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना संघटित शेती करण्याची संधी उपलब्ध होत आहे. यातून शेतकर्‍यांची क्रयशक्ती वाढवण्यास मदत होणार आहे.

महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्य
• महिला शेतकरी उत्पादित शेतीमालाचे सामूहिक संकलन
• दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी निविष्ठांची सामूहिक खरेदी
• शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभारणे. (डाळ मिल, आटा मेकिंग)
• ब्रंडिंग व पॅकेजिंगद्वारे बाजार मूल्य वाढविणे.
• स्थानिक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बाजारपेठेंची थेट जोडणी करणे.
• शासकीय योजना, कर्ज व अनुदान मिळवण्यासाठी समन्वय करणे.
• महिलांसाठी प्रशिक्षण, कौशल्य विकास व आर्थिक साक्षरता कार्यक्रम
• स्वयंसहायता गट व महिला शेतकर्‍यांना नेतृत्व व निर्णय क्षमतेची संधी


उमेद अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये 9 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आलेली असून जिल्हाभरातील महिला शेतकर्‍यांना यामुळे फायदा होणार आहे. कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे. मूल्य साखळीचे निर्माण करणे यासारख्या उपक्रमातून ग्रामीण शेतकर्‍यांना मोठ्या संधी कंपनीच्या माध्यमातून निर्माण होत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने उमेद अभियानाने सुरू केलेल्या या शेतकरी उत्पादक कंपन्या महत्त्वाची भूमिका निभावतील यात शंका नाही.
– आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

YouTube video player

पीएमच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात स्वतंत्र चार कंपन्या
पंतप्रधानांच्या महत्त्वकांक्षी दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात उमेदच्या माध्यमातून 4 शेतकरी उत्पादक कंपन्या स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आली असून यातील कोपरगाव तालुक्यात कौशल्या ग्रो महिला शेतकरी उत्पादक उत्पादक कंपनी, शेवगाव तालुक्यात स्मृतिमंथन महिला शेतकरी उत्पादक कंपनी, कर्जत तालुक्यात शेतीसंजोग महिला शेतकरी उत्पादक उत्पादक कंपनी आणि नेवासा तालुक्यात माती स्पर्श महिला शेतकरी उत्पादक उत्पादक कंपनीच्या स्थापना करण्यात आलेल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी कृषी सेवा केंद्रांची सुरुवात झाली असून या कृषी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून सवलतीच्या दरामध्ये कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...