पारनेर । तालुका प्रतिनिधी
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सुपा बस स्थानक चौकात गुरुवारी सायंकाळी अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुपा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.
गुरुवारी सायंकाळी, सुपा बस स्थानक चौकात, वाळवणे गावाच्या बाजूला असलेल्या स्वागत कमानीजवळ नागरिकांची गर्दी जमलेली असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक सादिक मकबूल सय्यद (रा. सुपा) यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, अंदाजे ३५ वर्षीय एक तरुण बेशुद्धावस्थेत पडलेला दिसला. सय्यद यांनी तातडीने तेथील नागरिकांच्या मदतीने तरुणाला रुग्णवाहिकेतून सुप्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर तो मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेनंतर सादिक सय्यद यांनी सुपा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. हिगसे आणि पो. हे. कॉ. गोरे यांनी तात्काळ घटनास्थळी व रुग्णालयात भेट दिली. त्यांनी पंचनामा पूर्ण करून मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. मृत तरुणाचे वय अंदाजे ३५ वर्षे असून, त्याचा रंग निमगोरा आहे. त्याने अंगात राखाडी रंगाचा शँडो स्वेटर, आतमध्ये फुल बाहीचा गुलाबी शर्ट आणि काळ्या रंगाची ट्रॅकस पॅन्ट परिधान केली आहे. पायात सँडल असून, त्याच्या छातीवर तीळ (लक्षण) आहे.
वरील वर्णनाशी जुळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्दल माहिती असल्यास किंवा कोणी बेपत्ता असल्यास, संबंधित नागरिकांनी तातडीने सुपा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन सुपा पोलिसांनी केले आहे. पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. हिगसे हे पुढील तपास करत आहेत.




