मुंबई | Mumbai
प्रसिद्ध युट्यूबर (You Tuber) आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) याच्या घरावर अज्ञातांनी पहाटे गोळीबार केला आहे. गुरुग्राम सेक्टर ५६ येथे एल्विशच्या घरावर दुचाकीवरून आलेली तीन अज्ञातांनी १० ते १२ गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात मोठी दहशत पसरली. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.
गुरुग्राम पोलिसांच्या (Gurugram Police) म्हणण्यानुसार, सकाळी ५.३० वाजता एल्विश यांच्या घरी गोळीबार झाला. तीन हल्लेखोर दुचाकीवरून आले होते, त्यापैकी दोघांनी गोळीबार केला. घराच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. एल्विशचे कुटुंब दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर राहते. गोळीबाराच्या वेळी केअरटेकर आणि कुटुंबातील इतर सदस्य घरात उपस्थित होते.
तसेच एल्विश यादवने आतापर्यंत या संदर्भात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. यावेळी गोळ्यांचे निशाण आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही बोलवण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हा गोळीबार केवळ इशारा म्हणून करण्यात आला असावा अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली, परंतु गुन्हेगारांची (Criminal) अद्याप ओळख पटलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर एल्विश यादवच्या घराजवळ (Home) सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच या घटनेमुळे सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली आहे. एल्विश यादवचे चाहते आणि फॉलोअर्स यांनी त्याच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांत सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार, कपिल शर्माच्या रेस्टॉरंटबाहेर झालेला गोळीबार त्यानंतर आता एल्विशच्या घराबाहेर गोळीबार झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.




