दिल्ली । Delhi
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचला आहे. सोमवारी कुवेतच्या हवाई हद्दीत अमेरिकेचे एक ‘F-15 ईगल’ (F-15 Eagle) लढाऊ विमान कोसळल्याची खळबळजनक घटना घडली. इराणने हे विमान आपल्या क्षेपणास्त्राने पाडल्याचा अधिकृत दावा केला असून, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर हा जगातील सर्वात मोठा लष्करी संघर्ष असल्याचे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या गोळ्याप्रमाणे गोल फिरत खाली कोसळणाऱ्या या विमानाचा व्हिडिओ इराणी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. विमानाला आग लागल्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत पॅराशूटच्या साहाय्याने वेळीच उडी घेतली. प्राथमिक अहवालानुसार, हा वैमानिक सुरक्षित असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणावर अद्याप अमेरिकन किंवा कुवेती संरक्षण दलांनी अधिकृत भाष्य केलेले नाही, मात्र कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने काही लढाऊ विमाने कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून शोधमोहीम सुरू असल्याचे सांगितले आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील हा ताजा संघर्ष इराणी भूमीवर झालेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर सुरू झाला. इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या लष्करी पायाभूत सुविधा आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर इराणने ‘ऑपरेशन इपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) अंतर्गत प्रत्युत्तरादाखल मोठे हल्ले सुरू केले आहेत. सोमवारी तिसऱ्या दिवशीही इराणने आखाती देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केले.
केवळ लढाऊ विमानच नाही, तर कुवेतमधील अमेरिकन दूतावासावरही इराणने ड्रोन हल्ला केल्याचे वृत्त आहे. दूतावास परिसरातून धुराचे लोट निघत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून, दूतावासाने आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आदेश दिले आहेत. कुवेतसह बहरीन आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या हवाई क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे आणि ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे. या तणावामुळे आखाती देशांमध्ये एअर रेड सायरन वाजत असून अनेक देशांनी आपली हवाई हद्द तात्पुरती बंद केली आहे.
या युद्धामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, याचे पडसाद अर्थव्यवस्थेवरही उमटू लागले आहेत. इराणने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जर अमेरिकेने हल्ले थांबवले नाहीत तर हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल. दुसरीकडे, अमेरिकन नौदलानेही आखाती देशांमध्ये आपल्या हालचाली वाढवल्या असून प्रतिहल्ल्यांची तयारी केली आहे. या लष्करी संघर्षात मोठ्या प्रमाणात नागरी आणि लष्करी जीवितहानी होत असल्याचे वृत्त असून, शांततेचे प्रयत्न सध्या तरी निष्फळ ठरताना दिसत आहेत.





