अहिल्यानगर । ज्ञानेश दुधाडे
जिल्हा बँकेच्या यंदाच्या निवडणुकीत भाजपमधील एका गटाची काँग्रेसच्या नेत्यांशी जवळीक, तर दुसऱ्या गटाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला राजकीय टेका यामुळे पक्षीय निष्ठेपेक्षा स्थानिक हितसंबंध अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे गेली अनेक वर्षे नगरच्या सहकारासह जिल्हा बँकेवर प्रभाव असणाऱ्या अजित पवार गटाच्या वर्चस्वाला लागलेला सुरुंग, दुष्काळाच्या नावाखाली बँकेत सुरू असणारे सोधाचे राजकारण आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची फरफट यामुळे यंदाची जिल्हा बँकेची निवडणूक अधिक गुंतागुंतीची बनली आहे.
दरम्यान, बँकेसाठी तीन अधुरे पॅनल तयार करण्यात आले असून, हेतूपरस्पर ते तयार करून बँकेतील सत्तेसाठी एकमेकांविरोधात मांडवी थाप देऊन निवडणुकीच्या रणधुमाळीचा टेंभा पेटवण्यात आला आहे. दुसरीकडे नुकताच कोल्हापूरच्या गोकूळ दूध संघाचा निकाल ताजा असताना, त्याच्या पुनरावृत्तीची आरोळी काही नेत्यांनी दिली असली तरी त्याला मतदार कसा प्रतिसाद देणार, जिल्ह्यातील पारंपरिक नेते ‘साथी हात बढाना’ यांच्या भूमिकेत राहणार की जिरवाजिरवीच्या राजकारणाची परंपरा कायम ठेवणार, यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ऑक्टोबर हिटचा प्रभाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिसणार असून, यावेळी कोण कोणाविरोधात कशी आरोपांची राळ उठवणार आणि त्याला संबंधित कसे उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दूसरीकडे राज्य आणि जिल्हा पातळीवर विरोधक असलेले नेते सहकाराच्या राजकारणात एकत्र येऊ शकतात, तर एकाच पक्षातील नेते वेगवेगळ्या आघाड्यांवर दिसू शकतात. त्यामुळे या निवडणुकीतील युती-आघाड्यांचा अर्थ केवळ पक्षीय राजकारणातून लावता येणार नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोण किती जागा जिंकतो, यावरून केवळ संचालक मंडळाचे चित्र स्पष्ट होणार नाही, तर जिल्ह्यातील राजकीय शक्ति संतुलनाचाही अंदाज येणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सहकाराच्या राजकारणातील प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची लढाई म्हणूनच पाहिले जात असून, यात जिल्ह्यातील पुढील राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पूर्वीपासून भाजपमध्ये दोन गटांची ढोबळमानाने विभागणी दिसून आली. यातील एका गटाने सुरुवातीपासून जिल्ह्यातील साखर कारखानादार आणि सोधाच्या नेत्यांना कुरवाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीपासून सावध असणाऱ्या भाजपमधील दुसऱ्या गटाने ऐनवेळी काँग्रेस, शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला आपल्या सोबत घेत जिल्ह्यातील सहकारात ङ्गहम सब एक हैफ पिक्चर दाखवला. यामुळे भाजपमधील दुसऱ्या गटाने जिल्ह्यातील विस्थापित असणारे राष्ट्रवादीचे शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य नाराजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कक्षेत विषय नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदाच्या निवडणुकीत शिंदे आणि पवार हे लांब असल्याचे अखेरच्या क्षणापर्यंत दिसून आले. यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक जिल्ह्यातील नेते आता आपापल्या दमावर लढणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत सर्वात जास्त फरफट एकनाथ शिंदे यांच्या गटाची झाली आहे. जिल्ह्यातील शिंदे गटाचे काही नेते खासदार नीलेश लंके यांच्यासोबत गेले आहेत, तर काही विखे-थोरात आणि गडाख यांच्या गटात आहेत. तर दुसरीकडे सर्वाधिक ताकदवान असणाऱ्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला सुरुंग लागलेला दिसत आहे. दरम्यान, वरवर सरळ दिसणारी जिल्हा बँकेची निवडणूक ही सोधाच्या राजकारणात घट्ट आवळली गेली आहे. यामुळे राजकीय पक्ष कोणताही असो नातेगोत्याच्या राजकारणात ‘एक एका साह्य करूं । अवघे धरू सुपंथ’ होतांना दिसत आहे.
जनरलच्या सहा जागांसाठी नेत्यांची कसोटी
तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात चौकार, षटकार ठोकत असलेल्या नेत्यांची जनरलच्या सहा जागांच्या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. या ठिकाणी अनेक बड्या नेत्यांचे समर्थक रिंगणात असून, तालुक्यातील हक्काच्या मतदारांचे जिल्हा पातळीवरील जनरलच्या सहाच्या सहा जागांवर पॅनल टू पॅनल मतदान घडवून आणावे लागणार आहे. तसे न झाल्यास कोल्हापूरच्या गोकूळच्या निकालाची नगरमध्ये पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
११ संचालकांची राजकीय फोड
आतापर्यंत बिनविरोध झालेल्या संचालकांमध्ये आमदार मोनिका राजळे, आमदार अक्षय कर्डिले, डॉ. सुजय विखे पाटील, ज्येष्ठ नेते बिपीन कोल्हे आणि जामखेडमधून सभापती शिंदे गटाचे सचिन घुमरे यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी अजितदादा गटात राजश्रीताई घुले, सचिन जगताप आणि दत्तात्रय पानसरे यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री शंकरराव गडाख, तर काँग्रेसच्या वतीने रणजितसिंह देशमुख आणि करण ससाणे यांचा समावेश आहे.
अपक्षांच्या खांद्यावर बंदूक
अकोले तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे अपक्ष असून त्यांच्याविरोधात ऐनवेळी भाजपच्या शिंदे गटासोबत गेलेल्या संजीवनी शिंदे यांची लढत होत आहे. तर कर्जतमध्ये पालकमंत्री विखे यांचे समर्थक अंबादास पिसाळ यांचे चिरंजीव तुषार पिसाळ हे अपक्ष रिंगणात असून त्यांच्याविरोधात भाजप-शिंदे गटाच्या ज्योती शिंदे रिंगणात आहेत.




