मुंबई | Mumbai
गेल्या चार दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन गुंडाळण्यासाठी आता राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आंदोलकांना आझाद मैदान परिसर रिक्त करण्याची नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावत आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान खाली करण्यास सांगितले आहे.
गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हजारो मराठा आंदोलक मुंबईत आले आहेत. यावेळी आंदोलकांनी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याने हायकोर्टाने जरांगेना फटकारले. मनोज जरांगे पाटील आणि इतर आंदोलकांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या अटींचे उल्लंघन केले आहे, असे निरीक्षण नोंदवत मुंबई हायकोर्टाने जरांगे व इतर आंदोलकांना परिस्थिती सुधारण्याची आणि मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्यास सांगितले आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही लोकशाही मार्गाने, कायद्याच्या व न्यायदेवतेच्या चौकटीत राहून आंदोलन करत आहोत. आम्ही नियम मोडलेले नाहीत. आम्हा गरिबांना न्यायदेवतेकडून खूप आशा आहेत. आम्ही आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करत आहोत. अशा काळात न्यायदेवता आमचा आधार बनेल. सरकार आम्हाला विचारत नाही, परंतु त्यांनी गोरगरिबांचा विचार केला तर त्यांना लोकांचा आशीर्वाद मिळेल. न्यायमंदिराने आमच्या वेदना पाहाव्यात. न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही शांततेत व लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत. आम्ही कुठेही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही.”
“सरकारने आमच्याविरोधात न्यायालयात जाऊन, इकडे-तिकडे जाऊन कितीही प्रयत्न केले तरी मी सरकारला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो की आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर आम्ही मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही. मराठा व कुणबी एकच आहेत, यासंदर्भातील शासकीय अधिसूचना काढल्याशिवाय, सगेसोयऱ्यांबाबतच्या अधिसूनचेची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. तुम्हाला यात काही अडचणी येत असतील तर आम्हाला तसं सांगा. आम्ही त्यावरील उपाय सुचवू.”
मनोज जरांगे पाटील म्हटले की, मी मेलो तरी मराठ्यांना ओबीसीतून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण मिळाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही. सरकार कोणत्याही थराला जाऊ दे, मी त्या थराला जायला तयार आहे. मला जेलमध्ये टाकले तरी मी तिकडेही उपोषण करेन. मात्र, आझाद मैदान कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला होता. मात्र, यानंतर काहीवेळातच पोलीस आझाद मैदान खाली करण्याची नोटीस घेऊन धडकले. त्यामुळे आता पुढे मुंबईत काय घडणार, हे पाहावे लागेल.
मुंबई पोलिसांच्या नोटीसमध्ये काय म्हंटले?
आंदोलकांचे सार्वजनिक जागेत असभ्य वर्तन
आपण दिनांक २९/०८/२०२५ रोजी पासून आझाद मैदान, मुंबई येथे आपले आमरण उपोषण हे आंदोलन सुरू केले असून त्यामध्ये आपल्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातील सुमारे ४०,००० आंदोलकाचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, सदर आंदोलनाशी संबंधित असलेली सुमारे ११,००० लहान मोठी चार चाकी वाहने मुंबई शहरात आणण्यात आली आहेत. त्यातील सुमारे ५००० वाहने ही दक्षिण मुंबईतील आझाद मैदान, मा. उच्च न्यायालय परिसर, मंत्रालय परिसर, कुलाबा, काळबादेवी, डोंगरी, पायुधनी, वाडीबंदर, इ. परिसरात आणण्यात आली असून त्यातील बहुतेक वाहने हि दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी मार्ग, दादाभाई नवरोजी मार्ग, महापालिका मार्ग, हजारीमल सोमाणी मार्ग, इ. मुख्य मार्गावर आणि सी.एस.एम. टि. जंक्शन, मेट्रो जंक्शन, ओ.सी.एस. जंक्शन, इ. मुख्य चौकांमध्ये अनाधिकृत रित्या उभी करण्यात आली आहेत. ही वाहने मुख्य मार्गावर व मुख्य चौकांमध्ये वाहतूकीच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता पार्क करण्यात आली असून त्यामुळे वाहतुकीचा पुर्ण बोजवारा उडालेला आहे. आंदोलकांनी रस्ते व चौकांमध्ये उघड्यावर अन्न शिजवून, अर्धनग्न अवस्थेत स्नान करून, उघड्यावर शौचास बसून व लघुशंका करून, सार्वजनिक स्वास्थास बाधा निर्माण केली आहे. तसेच, त्यांनी सार्वजनिक जागेत असभ्य वर्तन देखील केलेले आहे.
२९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता आंदोलन स्थगित करणे अपेक्षित होते. पण तसे न करता १ सप्टेंबरपर्यंत ते सुरु ठेवले आहे. आंदोलन सुरु ठेवण्याची परवानगी देण्याचा अर्ज नियमावलीतील विहित नमुन्यात नव्हता. ज्येष्ठ नागरिकांना आंदोलनामध्ये सहभागी करुन नियमांचा भंग केला. मुख्य मार्गावर व चौकात वाहने पार्क करुन वाहतूक कोंडी केली. ५ हजार पेक्षा जास्त आंदोलक आणून नियमाचा भंग केला. आपल्याच आंदोलनाने संपूर्ण परिसर व्यापल्याने परवानगी देता आली नाही. त्यामुळे इतर आंदोलनाला परवानगी देता आली नाही. त्यामुळे आंदोलनाचा हक्क बाधित झाला आहे.
आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात सी.एस.एम.टि., चर्चगेट रेल्वे स्थानके, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, मेट्रो जंक्शन, ओ.मी. एस. जंक्शन, सी.एस.एम.टि. जंक्शन या ठिकाणी मोर्चे नेवून रास्ता रोको केले, अश्लिल वर्तन केले, रस्त्यावर क्रिकेट / कबड्डी असे खेळ खेळून सार्वजनिक वाहतूकीस अडथळे आणले. तसेच त्यांनी रस्त्यावरील वाहनांचे टपावर चढून कपडे काढून विक्षिप्त नाचकाम केले व रस्त्यावरील सिग्नल पोल वर चढून नारेबाजी केली. तसेच, सिटी बममध्ये घुसखोरी करून मुंबईतील नागरीकांशी उद्धट वर्तन करून भांडणे केली. आंदोलकांनी आपल्या आंदोलना दरम्यान नियमबाह्य कामे करून नियमाचा भंग केला. स्वतः आंदोलनासाठी वापरत असलेल्या ध्वनीक्षेपकाची रितसर परवानगी घेतलेली नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




