Friday, May 3, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये व्हॅक्सिनचा साठा संपला; लसीकरणाचे काम थांबले

औरंगाबादमध्ये व्हॅक्सिनचा साठा संपला; लसीकरणाचे काम थांबले

औरंगाबाद – Aurangabad

कोरोना लसीकरणासाठी महापालिकेला प्राप्त झालेला लशींचा साठा आता संपला आहे. नवीन साठा येईपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे. महापालिकेने शासनाकडे एक लाख लशींची मागणी केली आहे, त्याच्या पुरवठ्याबद्दल शासनाकडून पालिकेला काहीच कळवण्यात आले नाही. त्यामुळे सोमवारपर्यंत वाट पाहावी लागू शकते असे मत पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेने शासनाच्या निर्देशानुसार १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु केले आहे. पाच एप्रिलपासून शहरात मेगा लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी ११५ वॉर्डांमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत, त्याशिवाय दोन सरकारी आणि २६ खासगी ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. मेगा लसीकरण मोहीमेसाठी महापालिकेने शासनाकडे दर आठवड्याला एक लाख लसींच्या डोसची मागणी केली आहे, परंतु मागणीनुसार महापालिकेला शासनाकडून कधीच लसींचा साठा मिळाला नाही.

महापालिकेला सोमवारी २५ हजार लसींचा साठा प्राप्त झाला आणि दोन दिवसातच हा साठा संपला. सोमवारी ११ हजार ६२१ जणांनी तर मंगळवारी १० हजार ५४ जणांनी लस घेतली. त्यामुळे बुधवारच्या लसीकरणासाठी तीन ते चार हजार डोस शिल्लक राहिले, त्यामुळे केवळ पालिकेच्या आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्र सुरु ठेवण्यात आले, अन्य केंद्र बंद करण्यात आले. आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रदेखील दुपारनंतर बंद पडली.

महापालिकेने शासनाकडे आता एक लाख कोविशिल्ड आणि २५ हजार कोवॅक्सिन लसींची मागणी केली आहे. लसींचा साठा केव्हा उपलब्ध करुन देणार या बद्दल शासनाकडून पालिकेला काहीच कळविण्यात आले नाही. त्यामुळे गुरुवारचे लसीकरण बंद ठेवण्यात आल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. लसींचा साठा मिळण्यासाठी सोमवारपर्यंत वाट पहावी लागू शकते असा उल्लेख त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या