नंदन रहाणे
आदिकाळापासून माणसाला स्वत:बद्दल आणि अवतीभवतीच्या जगाबद्दल अनिवार कुतुहल वाटत आले आहे. आपण, आपले शरीर, इतर माणसे, प्राणीपक्षी, झाडे झुडुपे, नद्या, डोंगर कुरणे हे सारे काय आहे? ते कसे बनते, आधी त्याचे स्वरुप काय होते, नंतर ते नष्ट होतांना दिसते, पण मग त्याचे काय होते? असे एक ना दोन… अनेक प्रश्न मानवाला सतत पडत आले. ही सृष्टी, हा निसर्ग यांची निर्मिती करणारा कोणीकोणीतरी नक्कीच असला पाहिजे असे माणसाच्या मनाने घेतले. मग त्याला त्याने सर्वोच्च शक्ती मानून, त्याची सुचेल त्या मार्गाने उपासना सुरू केली. त्याचा खेळ दिसतो पण प्रत्यक्ष खेळीया काही कुठेच दिसेना. साहजिकच लोकांनी देवामागोमाग स्वर्गाची कल्पना केली. देव जसा न दिसणारा… तसाच स्वर्गही न दिसणाराच! कोण त्याला इंद्रपुरी म्हणाले, कोण कैलास, कोण गोलोक, तर कोण वैकुंठ म्हणाले! तिथे जागा मिळावी म्हणून ऋषीमुनी जन्मभर तपश्चर्या करू लागले!
वारंकरी संप्रदायाचे सर्वात वेधक वैशिष्ट्य हे आहे की त्यानेे देवाचा सहवास तर अपेक्षिला; मात्र त्याचे जे काल्पनिक निवासस्थान ‘स्वर्ग’ त्याची अपेक्षा वारकर्यांनी कधीच कधी केली नाही. उलट तुझ्या त्या स्वर्गाची आम्हांला गरजच नाही असे ठणकावून सांगितले! खरी गंमत आणखी पुढेच आहे… संतांच्या अंगात एवढी धमक होती की ते देवालाही त्याच्या स्वर्गातून खाली खेचायची वार्ता करीत होते! फार प्राचीन काळी एखाद्या ऋषीचे पुण्य फार जडभारी झाले की, देवराज इंद्राला तो आपल्या स्वर्गाचा स्वामी बनेल अशी भीती वाटायची. मग तो अप्सरांना पाठवून तपोभंग करायचा आणि आपला स्वर्ग आपल्याच ताब्यात ठेवायचा. संतांना देवाचा हा स्वभाव पक्का माहीत असल्याने, त्यांंनी देवाला सांगितले की, तुझा तो कार्य स्वर्ग, कैलास, वैकुंठ असे जे काही असेल, ते तुलाच राहू दे… तू आमच्याबरोबर नाचायला कुदायला हसायला खेळायला ये गड्या –
नामाचिया बळे न भिंऊ सर्वथा।
कळिकाळाच्या माथा ।
सोटे मारु ॥1॥
वैकुंठीचा देव आणू
संकिर्तनी ॥
विठ्ठल गाऊनी ।
नाचू रंगी ॥2॥
सुखाचा सोहळा
करुनी दिवाळी ।
प्रेमें वनमाळी ।
चित्तीं धरु ॥3॥
सावता म्हणे ऐसा
भक्तीमार्ग धरा ।
तेणे मुक्ती द्वारा ।
वोळंगती ॥4॥
संत सावता महाराजांचा हा अभंग आहे आणि त्यात अक्षरश: ‘वार’ करण्याची वीरवृत्ती त्यांनी प्रकट केली आहे! ते म्हणताहेत, नामाचे म्हणजे देवाच्या नावाचे बळ आमच्याकडे आहे. आता आम्ही कोणालाच घाबरत नाही. चिंता- क्लेश- भय-दु:ख यांची काय तमा? अहो, प्रत्यक्ष सर्वभक्षक काळाच्या मस्तकावरच आम्ही सोट्याचे दणके मारु! तो जो वैकुंठातला देव आहे ना, त्यालाही त्याचा प्रासाद व राजधानी सोडायला आम्ही भाग पाडू… हे जे त्याच्या नावाचे नाम संकिर्तन मांडलेय ना आम्ही, तिथे असे गाऊ, असे नाचू, असा रंग जमवू की स्वत:च्या नावावर डोलायला तोच इथे आला पाहिजे आणि त्याला आम्ही आणूच!
हरिनामाचे दिवे लावून सुखाचा सोहळा असा करू की जशी काही दिवाळीच इथे अवतरली आहे. या सुंदर वातावरणात तो वनमाळी रंगला की आम्ही त्याला चित्तापाशी घट्ट धरू. अहो लोकहो, तुम्हीही हा असाच भक्तिमार्ग धरा. जेणेकरुन तुमच्या दाराशी पण मुक्ती येऊन उभ्या राहतील आणि म्हणतील की, चला वैकुंठसुख भोगा!!




