Wednesday, November 6, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांना तडकाफडकी पदमुक्त करून त्यांच्या जागी धारावीच्या आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ यांनी म्हटले आहे. गायकवाड यांच्या नियुक्तीनंतर प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वातही बदल होण्याचे संकेत असून नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन काँग्रेसने डिसेंबर २०२० मध्ये भाई जगताप यांच्याकडे मुंबई काँग्रेसची सूत्रे दिली होती. नियुक्ती नंतर सुरुवातीच्या काळात जगताप यांनी मुंबईत पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न केले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जगताप हे निष्क्रिय होते. त्यातच त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता. मात्र, राज्यात काँग्रेस हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने स्वबळाच्या नाऱ्यावर नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर पक्षाने मुंबईच्या नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या महिला अध्यक्षा

दरम्यान, वर्षा गायकवाड या अलीकडच्या काळातील मुंबई काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या आहेत. वर्षा गायकवाड या २००४ पासून धारावी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. अभ्यासू आणि आक्रमक महिला लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे. पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. मुंबईतील संघटनेचे नेतृत्व तरुण दलित आणि मराठी महिलेकडे सोपवून काँग्रेसने या घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सन्मानजनक यश मिळवून देणे तसेच आघाडीत समन्वय राखण्याचे आव्हान वर्षा गायकवाड यांच्यासमोर आहे.

नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची चर्चा

दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वात बदल झाल्याने आता लवकरच प्रदेश काँग्रेसमध्येही बदल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अलीकडेच मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यामुळे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय माजी मंत्री सतेज पाटील, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची नावे संभाव्य प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या