श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरात गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. काल दिवसभर शहरातील विविध रस्त्यांवर 97 बोगस वाहनांवर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात आली. त्यामुळे रस्त्याने अनेक वाहनधारक शिस्तीचे पालन करताना दिसले. शहरामध्ये अनेकदा मूळ कंपनीचे सायलेन्सर बदलून कर्ण-कर्कश आवाज करणारे सायलेन्सर, फटाके फोडणारे सायलेन्सर गाड्यांना लावले जातात, त्यामुळे नागरिकांना महिलांना, लहान मुलांना त्या आवाजाचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
तसेच विना नंबर प्लेटच्या गाड्या देखील विविध गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाण्याची शक्यता असते, या पार्श्वभूमीवर काल शहरामध्ये अशा अनेक वाहनांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. काल दिवसभर एकूण 97 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली, त्यापैकी 48 विना नंबर प्लेट असणारी वाहने शहर पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आली. त्यांच्यावर मोटर वाहन कायद्याखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय मॉडीफाय सायलेन्सर असणारी 6 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. त्यांचे विनापरवाना लावलेले सायलेन्सर काढून मूळ कंपनीचे सायलेन्सर बसवून, त्या गाड्या सोडून देण्यात आल्या. यापुढे देखील शहरात सातत्याने अशी कारवाई करण्यात येणार आहे. सर्वच वाहन चालकांनी दोन्ही नंबर प्लेट सुस्थितीत असल्याची खात्री करावी, त्याप्रमाणे मॉडीफाय सायलेन्सर कोणी वापरत असाल तर तात्काळ बदली करून मूळ कंपनीचे सायलेन्सर बसवावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला आहे.




