Friday, May 3, 2024
Homeनगरशेतकर्‍यांना स्वावलंबी बनविण्यात स्वयंचलीत तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची - कुलगुरू डॉ. पाटील

शेतकर्‍यांना स्वावलंबी बनविण्यात स्वयंचलीत तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची – कुलगुरू डॉ. पाटील

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

हवामानात शाश्वत उत्पादनासाठी शेतकर्‍यांनी शास्त्रीयदृष्ट्या शेती करणे गरजेचे आहे. यामध्ये एकात्मिक शेती, काटेकोर शेती, शेतीमध्ये स्वंयचलीत तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. या स्वयंचलीत तंत्रज्ञान प्रणालीचा विकास महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे केला जात आहे. असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

जागतिक बँक अर्थसहाय्यीत, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थान, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व भारतीय कृषी इंजिनिअर संस्था, नवी दिल्ली यांच्या संयुक्तपणे आयोजित 3.9 कृषीमधील स्वयंचलन याविषयी वेबिनारचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

भा.कृ.अ.प. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पातील कार्यरत असलेल्या हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन (कास्ट कासम) प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थान करिता बाबुर्डी घुमट व बुचकेवाडी या गावांमध्ये हवामान अद्ययावत तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य सुरू असून, हवामान अद्ययावत गाव तयार करण्यात येत आहेत. विद्यार्थी, शास्त्रज्ञ व शेतकर्‍यांना हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन या विषयी जागरुकता निर्माण व्हावी व तंत्रज्ञानाचा अवलंब झपाट्याने व्हावा याकरिता विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येत आहे. नैसर्गिक संसाधनांचे जतन, पिकांचे अचूक व्यवस्थापन, उत्पादनखर्चात बचत करून उत्पादनात वाढीसह कृषीचा शाश्वत विकास करून शेतकर्‍यांना स्वावलंबी बनविण्यात स्वयंचलीत तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले.

या ऑनलाईन वेबिनारप्रसंगी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी इंजिनियर संस्थेचे प्रमुख डॉ. गजेंद्र सिंग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल्याचे माजी कुलगुरू डॉ. व्ही.एम. मायंदे, मुंबई येथील सिफाचे संचालक डॉ. सय्यद इस्माईल, कास्ट प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार, सहप्रकल्प समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, सदस्य डॉ. सचिन नलावडे, अहमदनगर जिल्यातील पारनेर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी श्री.राहुल रसाळ, जळगाव येथील प्रगतिशील शेतकरी डॉ. रवींद्र निकम, दौंड तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी श्री. संदीप घोले आदी उपस्थित होते.

डॉ. गजेंद्र सिंग म्हणाले शास्त्रीयदृष्ट्या शेती केली तर शेती फायदेशीर ठरते. शेतकर्‍यांनी शाश्वत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा व शेतकर्‍यांनी स्वतःच्या शेतीमध्ये नवनविन प्रयोग करावेत आणि शेतीकडे उद्योग म्हणून बघावे.

डॉ. सुनील गोरंटीवार यांनी जल व्यवस्थापनाचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले व हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत विकसीत करण्यात आलेले विविध तंत्रज्ञान याविषयी विस्तृत माहिती दिली.

डॉ. मुकुंद शिंदे यांनी कास्ट-कासम प्रकल्पांतर्गत हवामान स्मार्ट गावे या संदर्भात माहिती दिली. डॉ. सचिन नलावडे यांनी कास्ट-कासम प्रकल्पाद्वारे संशोधीत शेती करिता ड्रोन व यंत्रमानव वापर विषयी माहिती दिली. या वेबिनारचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सय्यद इस्माईल यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या