Friday, May 3, 2024
Homeनगरपुणे-मुंबईत नाही, विखे परिवारावरही नगर-लोणीतच उपचार

पुणे-मुंबईत नाही, विखे परिवारावरही नगर-लोणीतच उपचार

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राज्य मंत्रिमंडळातील बहुतेक सदस्य आणि राज्यातील बहुतेक आमदार सध्या करोना पॉझिटिव्ह आहेत. राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील सध्या करोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर लोणी व अहमदनगर येथील त्यांच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचाराच्या पुणे- मुंबई सारख्या उच्चभ्रू संस्कृतीचा बडेजाव न करता पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून अहमदनगर व लोणी येथे सुरू असलेल्या रुग्णालयात उपचार घेत स्वतः निर्माण केलेली आरोग्य सुविधा परिपूर्ण असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

राज्यात राजकीय नेते आजारी पडल्यास मुंबई व दिल्लीत उपचारासाठी दाखल झाल्याचे अनेकदा पहावयास मिळते. विखे पाटील यांनी मात्र आपला प्रवरा पॅटर्न परिपूर्ण असून जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेत असलेले आपले दोन्ही रुग्णालये सुसज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.

हिवाळी अधिवेशनानंतर आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांनी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात एचआरसीटी स्कॅन केले. येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नगर येथे सुरू असलेल्या विलगीकरण कक्षात त्यांना दाखल करण्यात आले. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील यांनाही करोनाची लागण झाल्याने त्यांनाही नगर येथेच उपचारासाठी दाखल केले. काल खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांनीही नगर येथेच उपचार घेण्याचे पसंत केले.

पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून लोणी येथे प्रवरा मेडिकल ट्रस्ट 1976 मध्ये सुरू झाले. त्या माध्यमातून प्रवरा ग्रामीण रुग्णालय सुरू असून कॅन्सर, हृदयविकार, अस्थिरोग, प्रसुती विभाग, बालरोग अशा विविध सुसज्ज विभागासह 1500 बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू आहे. अहमदनगर येथेही 2004 पासून सुमारे 1200 बेडचे सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू आहे. कोविड 19 संक्रमण काळात दोन्ही ठिकाणी तपासणी प्रयोगशाळा, कोविड केअर सेंटर, ऑक्सीजन प्लांट, अतिदक्षता विभाग यांची स्वतंत्र उभारणी करून जिल्ह्यातील हजारो रुग्णांवर येथे यशस्वी उपचार करण्यात आले. शासकीय यंत्रणा कमी पडल्यास विखे पाटलांनी आपली दोन्ही रुग्णालये रुग्णांसाठी खुली ठेवली.

यापूर्वीही स्व. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आजारपणात त्यांनी लोणी येथील रुग्णालयातच उपचार घेतले. त्यांच्या पत्नी स्व. सिंधुताई विखे पाटील यांनी देखील येथेच उपचार घेतले. आताही करोना संसर्ग काळात विखे परिवाराने स्वतः आपल्या रुग्णालयात उपचार घेऊन आपली रुग्णालये पुणे मुंबई पेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.

विखे पाटील परिवाराने जिल्ह्यातच आपल्या रुग्णालयात उपचार घेतल्याने सामान्य रुग्णांचा रुग्णालयावर असलेला विश्वास अधिक वाढला आहे. एखाद्या राजकीय नेत्याने जिल्ह्यातच सर्वसामान्य रुग्णांसाठी अति सुसज्ज आरोग्य व्यवस्था उभी केल्याचे व स्वतः तेथेच उपचार घेण्याचे राज्यातील हे एकमेव उदाहरण आहे.

– महेश वाघे, संयोजक, भाजयुवमो सेल मीडिया राहाता

- Advertisment -

ताज्या बातम्या