Thursday, May 2, 2024
Homeनगरगावोगाव सरपंच आरक्षणाचीच चर्चा

गावोगाव सरपंच आरक्षणाचीच चर्चा

नेवासा |का. प्रतिनिधी|Newasa

नेवासा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडून सदस्यांच्या निवडी झाल्यानंतर गावोगाव आता सरपंचपद आरक्षणाचीच चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होण्याआधीच दोन दिवस सरपंच आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानंतर तो निवडणुका संपेपर्यंत स्थगित करण्यात आला. आता निवडणुका पार पडल्या आहेत. खरी प्रतिष्ठा असते ती सरपंच पदावर. या पदासाठी अनेकजण इच्छुक असतात.

सरपंच पद ठराविक प्रवर्गासाठी सोडत घेऊन निश्चित होते. सर्वसाधारणसाठी सरपंचपद खुले असल्यास सर्व सदस्य यासाठी पात्र ठरतात. मात्र विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्यास त्याच प्रवर्गातून निवडून गेलेल्या व्यक्तीसच ती संधी मिळते. ग्रामपंचायतीत त्या वर्गाची ती एकमेव व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला संधी चालून येते. मग त्या गटाचे बहुमत असो अथवा नसो.

सरपंच आरक्षण सोडती जाहीर न होता यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुका झालेल्या असल्याने सर्वच प्रवर्गाचे सदस्य निवडून येण्यासाठी गावपुढार्‍यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. आता सरपंचपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी पडते याची उत्कंठा निवडून आलेल्या सर्वच सदस्यांना लागली आहे.

कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यास कोणाला सरपंच करता येईल. कोणाला या पदावर बसवल्यास आपल्याला फायद्याचे राहील याचा अंदाज बांधण्यास गावपुढार्‍यांनी सुरुवात केली आहे. सरपंचपदाच्या आरक्षणाची आता गावोगाव चर्चा सुरू असून ही आरक्षण सोडत निघाल्यावर आपल्या गटाचा सरपंच निवडून येण्यासाठी राजकीय हालचाली गतीमान होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या