मुंबई | mumbai
भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरू आहे. पावसामुळे दोन दिवस वाया गेल्याने टीम इंडियाने फलंदाजी करताना आक्रमक शैलीत फलंदाजी सुरू केली. बांगलादेशने पहिल्या डावात २३३ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने चार गडी गमावून २४६ धावा केल्या आहेत. अशातच या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक केलाय.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही कानपूर कसोटीमध्ये एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीने ३५ धावा करताच एक असा विक्रम रचला, ज्याबाबत दिग्गज खेळाडू स्वप्नही बघत नसतील. विराटने कानपूर कसोटीत ३५ धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. असा रेकॉर्ड करणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे.
विराट कोहली याने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात ३५ बॉलमध्ये ४७ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने चार चौके अन् एक षटकार लगावला. विराटची हाफ सेंच्युरी जरी हुकली असली तरी देखील विराटने या इनिंगमध्ये सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडला. सचिन तेंडूलकरने ६२३ इनिंगमध्ये २७ हजार धावांचा टप्पा पार केला होता. आता विराटने केवळ ५९४ इनिंगमध्ये २७ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा विराट चौथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७००० धावांचा डोंगर सर केला. विराटच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावांचा पल्ला गाठला आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने १३९०६ धावा केल्या आहेत. तर टी -२० क्रिकेटमध्ये त्याने ४१८८ धावा केल्या आहेत. विराटने ५९४ डावात हा डोंगर सर केला आहे. यासह तो सर्वात जलद २७००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा