मुंबई । Mumbai
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा मोठा फटका आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला बसला असून, आखाती देशांमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धजन्य स्थितीमुळे हवाई क्षेत्र बंद झाल्याने अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकून पडले होते. यातच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा देखील कुवेतमध्ये अडकल्याने सुभेदार कुटुंबीय चिंतेत होते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर अभिनय सुभेदार यांच्यासह ३० महाराष्ट्रीयन नागरिक आज पहाटे मुंबईत सुरक्षितपणे दाखल झाले आहेत.
अभिनय सुभेदार हा लंडनला जात असताना कुवेत येथे ट्रान्झिटसाठी थांबला होता. त्याच सुमारास इराणकडून कुवेतवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका निर्माण झाल्याने सुरक्षा कारणास्तव कुवेतचे हवाई क्षेत्र तातडीने बंद करण्यात आले. यामुळे अनेक नियोजित उड्डाणे रद्द झाली आणि अभिनयसह अनेक मराठी प्रवासी तिथेच अडकले. तेथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला मुलगा संकटात असल्याची माहिती दिली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी भावनिक साकडे घातले होते.
या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विशाखा सुभेदार यांना फोन करून त्यांच्या मुलाला आणि इतर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर या नागरिकांच्या सुटकेसाठी तातडीने हालचाली सुरू झाल्या. कुवेतमध्ये अडकलेल्या या प्रवाशांना सौदी अरेबियातील रियाध मार्गे भारतात आणण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, यासाठी तातडीने व्हिसा मिळवणे हे मोठे आव्हान होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी असीम महाजन यांनी पुढाकार घेतला आणि व्हिसा प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली.
व्हिसा मिळाल्यानंतर या ३० प्रवाशांनी कुवेत ते रियाध असा तब्बल ७०० किलोमीटरचा प्रवास रस्ते मार्गाने पूर्ण केला. सुमारे १० तासांच्या या प्रवासानंतर हे सर्व नागरिक रियाध विमानतळावर पोहोचले. तेथून ९ मार्च रोजी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी त्यांनी मुंबईकडे प्रस्थान केले. अखेर १० मार्च रोजी पहाटे ३ वाजता हे सर्व प्रवासी मुंबई विमानतळावर सुखरूप उतरले. यावेळी आपल्या मुलाला आणि सहकाऱ्यांना पाहून कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
या संपूर्ण बचाव मोहिमेत कुवेतमधील भारतीय दूतावासाने मोलाची भूमिका बजावली. युद्धजन्य परिस्थितीमध्येही भारतीय अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हे सर्व नागरिक सुरक्षितपणे मायदेशी परतू शकले आहेत. आपला मुलगा सुखरूप घरी परतल्याने विशाखा सुभेदार यांनी सरकार आणि प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत. आखाती देशांतील तणाव अद्याप कायम असल्याने उर्वरित भारतीयांच्या सुरक्षिततेकडेही आता सरकारचे लक्ष लागले आहे.





