Wednesday, December 4, 2024
Homeनगरमुरकुटे-लंघे वाद शनी महाराजांच्या न्यायालयात

मुरकुटे-लंघे वाद शनी महाराजांच्या न्यायालयात

एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान || आज शपथेचा प्रयोग?

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

विठ्ठलराव लंघे व बाळासाहेब मुरकुटे यांच्यात एकमेकांवर राजकीय टीका होत आहे. मुरकुटे यांनी तर जाहीर आव्हान दिले आहे. माझ्यावर खोटे आरोप केले जात असून मी शनी चौथर्‍यावर जाऊन शपथ घेतो, असे त्यांनी म्हटले आहे. यावर महायुतीकडून भाजपचे ऋषिकेश शेटे यांनी शनिवारी, 9 नोव्हेंबर रोजी शिंगणापुरात दाखल होणार असल्याचे जाहीर करत प्रतिआव्हान दिले आहे.

- Advertisement -

राजकारण करत असताना दैवताला यात ओढणे चुकीचे आहे. 20 दिवसांपूर्वी लंघे व मुरकुटे एका व्यासपीठावरून आमदार शंकरराव गडाख यांच्यावर टीका करत होते. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही एकत्रपणे लढणार असल्याच्या आणाभाका घेत होते. पण हे दोघे आता वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक मैदानात आहेत. गडाख व लंघे यांच्यात प्रवरेच्या माध्यमातून सेटलमेंट झाली असून अजूनही ज्ञानेश्वरच्या संचालकपदाचा राजीनामा नाही, असा जाहीर आरोप मुरकुटे गटाकडून होत आहे. तर मुरकुटे हे गडाखांशी नेहमी अंधारात युती करतात. शिंगणापूर विश्वस्त निवड, मुळा व ज्ञानेश्वर कारखाना निवडणुका बिनविरोध कशा होतात, याचे उत्तर बाळासाहेब मुरकुटे यांनी दिले पाहिजे, अशी टीका लंघे गटाकडून होत आहे.

मुरकुटे यांना प्रतिसाद
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा जनसंपर्क, तालुक्यातील विकास कामे व उमेदवारीवर झालेली कुरघोडी यामुळे मुरकुटे यांच्याविषयी तालुक्यात सहानुभूती राखणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या सभेला, प्रचार फेरीला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

आरोपांच्या फैरी
बाळासाहेब मुरकुटे यांना कुणी राजकारणात आणले? काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कुणी केले? असे सवाल लंघे गटाकडून तर विठ्ठलराव लंघे यांना गडाख यांच्या विरोधात जनतेने 80 हजार मते दिली तरीही ते 2009 नंतर गडाखांच्या तंबूत का गेले? गडाखांनी त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष का केले, याची चर्चा मुरकुटे गटाकडून घडविली जात आहे. 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर दोघांपैकी एखादा नेता शंकरराव गडाख यांच्या गटात सामील तर होणार नाही, अशी चर्चाही झडू लागली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या