Thursday, May 2, 2024
Homeनगरविकासाच्या प्रश्नावर चौकात या, मारामार्‍या करण्यासाठी नको

विकासाच्या प्रश्नावर चौकात या, मारामार्‍या करण्यासाठी नको

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

आमदार होऊन तीन वर्षे झाले तरी अजूनही ते स्वतःवर गुलाल उधळण्यात मग्न असून विरोधक बालिश बुद्धी प्रमाणे वागत आहेत. तीन वर्षात हजार कोटी रुपये आणल्याचा दावा आ.काळे करत असून ही मोठी हास्यास्पद गोष्ट आहे. विकासाच्या प्रश्नांवर चौकात या, असे आवाहन केल्यावर आमदार मारामारीची भाषा करत असून यायचेच असेल तर शहराच्या विविध विकास मुद्यांवर चर्चा करण्यासाठी यावे त्यासाठी आमची कधीही तयारी आहे, असे आव्हान विवेक कोल्हे यांनी विरोधकांना केले आहे.

- Advertisement -

कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर भाजप, सेना, आरपीआयच्या वतीने अवास्तव वाढीव घरपट्टी बाबत साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली यावेळी ते बोलत होते.

यावेळी युवा नेते विवेक कोल्हे, भाजपा नेते पराग संधान, केशव भवर, कैलास जाधव, रवींद्र पाठक, बबलू वाणी, वैभव आढाव, दत्ता काले, संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, शिवाजी खांडेकर, अतुल काले, योगेश बागुल, विजय वाजे, विनोद राक्षे, सत्यन मुंदडा, जितेंद्र रनशूर, बाळासाहेब आढाव, सागर जाधव, अविनाश पाठक, राहुल सुर्यवंशी, पिंकी चोपडा, संदीप देवकर, सुशांत खैरे, बाळासाहेब नरोडे, अविनाश पाठक, अशोक लकारे, जनार्धन कदम, वैभव गिरमे, रवींद्र नरोडे, प्रशांत कडू, ज्ञानेश्वर गोसावी, सागर जाधव विद्या सोनवणे, मंगला आढाव, वैशाली आढाव, हर्षा कांबळे, ताराबाई जपे, सुवर्णा सोनवणे, शिल्पा रोहमारे, आदींसह भाजप- सेना कार्यकर्ते उपस्थित होते.

पराग संधान म्हणाले, नगरपालिकेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात उपोषण सुरू केलेले असून, ठराविक पक्षाचे निवेदनावर 40 टक्के करवाढ झालेली आहे. आर. एस. कन्ट्रक्शन यांनी सर्व्हे चुकीचा केला असल्याचे पालिका प्रशासनाने मान्य केलेले असून याच कंपनीने सिल्लोडचा देखील सर्व्हे केलेला असून तेथील स्थानिक आमदारांनी कार्यक्षमता दाखवत मागील वर्षी प्रमाणे घरपट्टी लागू करावी हा निर्णय घेतलेला आहे. सिल्लोड प्रमाणे कोपरगावलाही पट्टी अकरावी ही मागणी केलेली आहे.

साखळी उपोषणाचा पहिलाच दिवस सायंकाळी मुख्याधिकारी व सर्व्हे करणारे आर.एस. कंपनीचे अधिकारी, पालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह उपोषणस्थळी भेट दिली. साळखी उपोषणातील मागण्यांबाबत मुख्याधिकार्‍यांनी त्यांच्याशी चर्चा केली व सर्वेत त्रुटी असल्याचे मान्य केले. मात्र भाजपाचे पराग संधान, शिवसेना आदी मित्र पक्षातील कार्यकर्त्यांनी कोपरगाव पालिका प्रशासन हे आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवते तसेच लोकप्रतिनिधींना करवाढ कमी केल्याचे श्रेय त्यांना मिळावे अशा पद्धतीने दुजाभाव करत आहे. तसेच प्रशासनाने आम्हाला जुन्याच कर आकारणीप्रमाणे कर आकारणी करावी तसेच सर्व्हे करणार्‍या आर. एस. कंपनीमुळे शहरातील नागरिकांना त्रास झाला आहे.

तरी देखील पालिकेने त्यांना 35 लाख रुपये अदा केले आहे. ते दंडासह 70 लाख रुपये वसूल करावे व या कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे या मागण्या केल्या. वरील सर्व मागण्यांबाबत प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपात द्याव्या ही मागणी लावून धरली. दरम्यान दोन तास चर्चा होऊनही यात कुठलाही तोडगा निघत नसल्याने अखेर मुख्यधिकारी शांताराम गोसावी व अधिकारी कर्मचारी यांनी तेथून काढता पाय घेतला. नंतर उपोषणकर्त्यांनी घोषणाबाजी केली. बर्‍याच वेळ चाललेल्या या राजकीय कलगीतुर्‍यातून कुठलाही मार्ग निघालेला नसून यावर आता पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी काय निर्णय घेतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या