Wednesday, November 20, 2024
Homeनगरदहा दिवसांवर आली मतमोजणी प्रशासनाची लगबग सुरू

दहा दिवसांवर आली मतमोजणी प्रशासनाची लगबग सुरू

28 तारखेला कर्मचार्‍यांना प्रशिक्षण || उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी मतदार प्रक्रिया पार पडली असून आता येत्या 4 जूनला होणार्‍या मतमोजणी प्रक्रियेसाठी अहमदनगर जिल्हा निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. दरम्यान, मतमोजणीच्या कामासाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली असून येत्या मंगळवारी (दि.28) मतमोजणी प्रक्रियेत काम करणार्‍या नगर आणि शिर्डी मतदारसंघातील कर्मचारी-अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

- Advertisement -

4 जूनला नगरच्या एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या दोन गोदामात नगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. यासाठी 768 कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरम्यान लोकसभेच्या एका मतदारसंघासाठी एका टेबलासाठी चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात सुक्ष्मनिरीक्षकाचा देखील समावेश राहणार आहे. 4 जूनला सकाळी 8:00 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 96 टेबलवर मतमोजणी होणार आहे. असे एकूण 192 टेबल असणार आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी 16 टेबल असणार आहेत. यामध्ये पोस्टल मतांसाठी दोन टेबल,

तर ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल असणार आहेत. एका टेबलवर 4 कर्मचारी असतील. यामध्ये पर्यवेक्षक, सहायक, मायक्रो ऑब्झर्व्हर आणि एक शिपाई असे चार कर्मचारी मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहेत. या आठवडाभरात कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवडणूक विभागाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, तर शिर्डीत 20 उमेदवारांमध्ये लढत होती. दोन्ही मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.

नगरमध्ये 66.61 टक्के म्हणजे 13 लाख 20 हजार 168 मतदान झाले, तर शिर्डीसाठी 63.03 टक्के म्हणजे 10 लाख 57 हजार 298 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, 13 तारखेला मतदान झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात सर्वत्र एकाच प्रश्नावर खल सुरू असून निवडून कोण येणार. कोणत्या तालुक्यात कोण चालले, कोणाला लीड मिळणार याबाबत शहरासह ग्रामीण भागात चर्चा सुरू असून यामुळे मतदारांसह उमेदवारांचा जीव टांगणला लागला आहे.

पुढील आठवड्यापासून पूर्वतयारी
जिल्ह्यातील दोनही लोकसभा मतदारसंघात असणार्‍या मतदान केंद्रनिहाय मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहे. मतदान केंद्र भागीले 14 या पध्दतीने मोजणीसाठी आखणी करण्यात येणार आहे. याचे नियोजन करण्यात सध्या निवडणूक शाखा व्यस्त असून पुढील आठवड्यापासून प्रत्यक्षात मतमोजणीसाठी पूर्वतयारी सुरू होणार आहे.

एका टेबलावर पोस्टलचे 600 मतदान मोजणार
नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात पोस्टल मतदान मोजण्यासाठी स्वतंत्र टेबल लावण्यात येणार आहे. यात अन्य विधानसभा मतदारसंघात एक तर नगर शहर विधानसभा मतदारसंघात पोस्टलसाठी दोन टेबल राहणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत पोस्टलची एका टेबलवर 600 पेक्षा अधिक मतमोजणी करू नका, अशा सूचना असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या