मुंबई । Mumbai
गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद चर्चेत आल्याचं दिसत आहे. छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडावरून हटवण्यात यावं, अशी मागणी करणारं पत्र राज्य सरकारला दिलं आहे.
मात्र, त्यांच्या या मागणीनंतर वाघ्या कुत्र्याच्या ऐतिहासिक संदर्भांबाबत शोध घेतले जाऊ लागले. खरंच शिवरायांकडे वाघ्या नावाचा असा कुठला कुत्रा होता का? यावर चर्चा सुरू झाली. त्यासंदर्भात आता खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनीच पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे. “वाघ्या कुत्रा ही दंतकथा आहे. एका ‘राजसंन्यास’ नाटकातून या वाघ्या कुत्र्याची दंतकथा जन्माला आली. ही कथा एवढी मोठी झाली की, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीपेक्षा वाघ्या कुत्र्याचे स्मारक उंचीने मोठे झाले. यातून ‘छत्रपतीं’ची बदनामी आहे ना? असा प्रश्न संभाजीराजे छत्रपतींनी केला.
संभाजीराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांना अग्नी दिला तेव्हा कुत्र्याने उडी मारल्याचा कोणताही संदर्भ नाही. लोकमान्य टिळकांनी जिर्णोद्धार केला तेव्हा शिवभक्तानी वर्गणी गोळा केली. एकाही इतिहासकाराने म्हटले नाही की आमच्याकडे पुरावे आहेत. सगळ्या इतिहासकारांना राज्य सरकारने बोलवावे अशी मागणी सुद्धा संभाजीराजे यांनी केली. ते म्हणाले की जे विरोध करतात त्यांनाही बोलवावे. वाघा कुत्र्याच्या स्मारकाची उंची शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा उंच असल्याचे संभाजी राजे छत्रपती यांनी सांगितले.
दुर्दैवाने, तुकोजी होळकर महाराजांचे नाव त्या ठिकाणी जोडले जात आहे. मात्र, ते म्हणाले की कुत्र्याच्या समाधीसाठी ते कसे पैसे देतील? तुकोजी महाराज शिवभक्त होते, तर कृष्णराव केळुसकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत तुकोजी होळकर यांनी विकत घेऊन देशभरातील ग्रंथालयांना वाटल्याचे संभाजीराजे म्हणाले. होळकर आणि छत्रपती घराण्याची जवळचे संबंध होते. धनगर समाज विश्वास ठेवणारा असल्याचे त्यांनी सांगितले.