मुंबई | Mumbai
बीड येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपासाची चक्रे फिरवत आहे.अशातच बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांना २९ डिसेंबरच्या रात्रीच पुण्यातून सीआयडीने अटक केल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, सीआयडीने वाल्मिक कराडला अटक केल्याचे वृत्त फेटाळून लावत त्याला अटक केलेली नाही, असे सांगितले आहे.
दुसरीकडे आज वाल्मिक कराड पुण्यातील (Pune) सीआयडी ऑफिसमध्ये शरण येणार असून त्या पार्श्वभूमीवर सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोलीस (Police) बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार असून ते सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण येतील, अशी चर्चा होती. मात्र, अद्याप वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेले नाहीत. पंरतु, आता पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेरील हालचालींना वेग आल्याने वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरणागती पत्कारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर आता पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, स्थानिक पोलिसांची मदत मुख्यालयासमोर बंदोबस्तासाठी घेण्यात आली आहे.वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी असला तरी केज पोलीस ठाण्यात (Cage Police Station) दाखल असलेले तिन्ही गुन्ह्याचा तपास सीआयडी करत आहे, त्यामुळे तो सीआयडीकडे समर्पण करेल, अशी माहिती समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतले जात असून त्याच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी केली जात आहे. तर वाल्मिक कराडची १०० हून अधिक बँक खाती गोठविण्यात आली आहेत.