पुणे । Pune
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याने काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्याला सीआयडीच्या १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्यानंतर तो कालपासून तुरुंगात आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी केली जात आहे. काल रात्रीच्या सुमारास त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या पथकानं त्याची तपासणी केली. कराडला मधुमेहाचा त्रास आहे.
काल रात्री त्यानं केवळ अर्धी पोळी खाल्ली. त्यानंतर सकाळीदेखील त्यानं नाश्ता केला नाही. रात्रीच्या सुमारास त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. याची माहिती त्यानं पोलिसांना दिली. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकानं त्याची लगेचच तपासणी केली. त्याला काही वेळ ऑक्सिजनही लावण्यात आला. आता तब्येत रात्रीच्या तुलनेत बरी आहे.
दरम्यान, खंडणीप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू असताना वाल्मिक कराड नागपुरात असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यानंतर सुरूवातीचे दिवस तो पुण्यात राहिला. यानंतर साधारण आठ दिवसापूर्वीनंतर तो महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याची माहिती उघड झालीय. त्यानंतर राज्याबाहेर गेल्यावर त्यानं इतर राज्यामध्ये देवदर्शन केलं.
मस्साजोगचे संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृणपणे हत्या झाली. या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजला जाणाऱ्या वाल्मिक कराड याचे नाव आले. तो मुख्य संशयित असल्याचा आरोप होऊ लागला. त्याच्या खंडणीसह अनेक गुन्हे दाखल आहे. घटना घडल्यापासून तो फरार होता. त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. 31 डिसेंबर रोजी तो पुणे सीआयडी कार्यालयात शरण आला. त्याच्यासह इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बीड आणि बुलढाण्यात सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला होता.