Sunday, May 19, 2024
Homeनगरवारीत सरपंचपदासाठी रस्सीखेच

वारीत सरपंचपदासाठी रस्सीखेच

वारी |वार्ताहर| Wari

कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेली पूर्व भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून वारी गावाकडे पाहिले जाते. या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून 17 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाले असून पहिल्यांदाच जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंचपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

- Advertisement -

तालुक्यात काळे-कोल्हे हे पारंपारिक विरोधक आहेत. दोघांचेही कार्यकर्ते तालुक्यात समसमान आहेत. वारी गावही याला अपवाद नाही. येथेही दोन्ही गटाचे तुल्यबळ कार्यकर्ते आहेत. सर्वच निवडणुकांसह ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे गटाचे नेतृत्व माजी सभापती मच्छिंद्र टेके करतात तर काळे गटाचे नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, मार्केट कमिटीचे माजी चेअरमन सुरेश जाधव व भाजपचे माजी तालुका अध्यक्ष नामदेव जाधव हे करत आहे. सध्या दोन्ही गटाची मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. मात्र सरपंचपद जनतेतून असल्याने सदस्य पदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या कमी झाली आहे. सदस्य पदासाठी मनधरणी केली असता आम्हाला सरपंच पदाची उमेदवारी द्या, अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे नेतृत्व करणार्‍या नेत्यांची कसोटी लागली आहे.

कोल्हे गटाकडून सरपंच पदासाठी माजी सभापती मच्छिंद्र टेके यांच्या पत्नी कुसुमताई टेके यांच्या नावाची चर्चा आहे. काळे गटाकडून मधुकर टेके यांच्या पत्नी मंदाताई टेके, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नामदेव जाधव यांच्या भावजाई सरला वाल्मिक जाधव, माजी सरपंच बद्रीनाथ जाधव यांच्या पत्नी योगीता जाधव व वारी ग्रामदैवतचे अध्यक्ष महेश टेके यांच्या पत्नी वंदना टेके या इच्छुक आहे. कोल्हे गटापेक्षा काळे गटाकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. या इच्छुकांना काळे गटाचे नेते कशी मनधरणी करतात हे महत्वाचे ठरणार असून इच्छुकांची नाराजी दूर करण्यास स्थानिक नेतृत्वाला जर अपयश आले तर बंडखोरीचा मोठा धक्का काळे गटाला बसू शकतो. ऐनवेळी तिरंगी लढतही या ग्रामपंचायतमध्ये होऊ शकते. सध्या तरी इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने भेटीगाठी घेत असून मतदारांची मनधरणी करताना दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या