Monday, May 6, 2024
Homeनाशिकजलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

नाशिक । प्रतिनिधी

शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी कंपनी, गॅस पाईपलाईन व महाआयटी यांची कामे सुरु असुन याच कामांचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. याच पार्श्वभूमीवर काल शहरातील शालीमार चौकात सायंकाळी अचानक गंगा अवतरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

- Advertisement -

महाकवि कालिदास कलामंदिरासमोर रस्त्यावर सुरू असलेल्या कामांत जेसीबी मशिनच्या धक्क्याने मोठी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी शालीमार चौकातून शहरात शिरल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला.

नाशिक शहरातील महाकवि कालिदास कलामंदिरासमोरील रस्त्यावर गेल्या काही दिवसापासुन स्मार्ट सिटी कंपनी अंतर्गत रस्त्याच्या कडेला केबल टाकण्याचे काम सुरु असुन एका बाजुला रस्ता फोडण्यात आला आहे. हे काम सुरु असतांना याच भागात असलेल्या मोठ्या जलकुंभाला जोडणारी पाईपलाईन जेसीबीच्या धक्क्याने फुटल्यानंतर संबंधीत ठेकेदारांचा मोठा गोंधळ उडाला. याठिकाणी भालेकर मैदानावर असलेल्या जलकुंभ भरण्याचे काम या पाईपलाईनद्वारे सुरु असतांना सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला.

या जलवाहिनीतून प्रचंढ दाबाने पाणी बाहेर पडुन ते कालिदास समोरील रस्त्याने थेट शालीमार चौक व गंजमाळ भागात मोठ्या वेगाने शिरले. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात हे पाणी पुढे मेनरोड व गंजमाळ चौकातून जुने नाशिक भागात शिरले. काही मिनीटात या भागात रस्त्यावर पाणीच पाणी वाहन असल्याने वाहनांचा वेग कमी झाला, नागरिकांना पायी चालणे कठीण झाले. या घटनेची माहिती तात्काळ शिवसेना कार्यालयातून महापालिका प्रशासनाला कळविण्यात आली.

शालीमार चौकात पाण्याचा वेग मोठा असल्याने काही भागात एक फुटापर्यत पाणी साठले गेलेे. तर याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसला. दिवसभर उन्हाचा तटाखा बसलेला असल्याने लाखो लिटर पाण्यामुळे गारवा निर्माण झाला. चौकात काही भागात खड्डे असल्याने शिवसैनिकांनी रस्त्यावर थांबत नागरिकांना सतर्क करित मदत कार्य केले.

या प्रकारामुळे महापालिकेचे लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला. स्मार्ट सिटीकडुन अनेक ठिकाणी रस्त्यावर कामे सुरु असतांना पोलीसांची परवानगी घेतली जात नसल्याचा प्रकार पंचवटीत घडल्यानंतर आज याठिकाणी जलकुंभ भरला जात असतांना यादरम्यान काम बंद ठेवण्याची गरज असतांना याची माहिती ठेकेदाराने कळविली नाही. यावरुन स्मार्ट सिटीच्या ठेकेदारांकडुन दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे.

तात्काळ पाणी बंद केले – चव्हाणके

कालिदास कलामंदीरासमोर स्मार्ट सिटी कंपनीकडुन रस्ता फोडून केबल व इतर व्यवस्था करण्याचे काम एका बाजुला केले जात आहे. याठिकाणी ठेकेदाराकडुन जलकुंभाला जोडणारी पाईल लाईन फुटली गेल्याने पाणी रस्त्यावर आले. यासंदर्भात तातडीने दखल घेत पाणी बंद करण्यात आले आहे. – एस. एम. चव्हाणके अधिक्षक अभियंता मनपा.

- Advertisment -

ताज्या बातम्या