लोणी |वार्ताहर| Loni
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या मासिक रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करताना जलसंरक्षण हा लोकचळवळीचा भाग बनवण्याचा दिलेला संदेश प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा 132 वा भाग अनेक विषयांच्या माहितीने वेगळेपण दर्शविणारा होता. यामध्ये प्रामुख्याने जन आंदोलनातून कॅच द रेन उपक्रमाची मांडलेली संकल्पना पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी उपयुक्त ठरणारी असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. पंतप्रधानांनी देशातील विविध जिल्ह्यांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या अमृत सरोवरांचा केलेला उल्लेख मार्गदर्शक असून छत्तीसगड मध्ये शेतकर्यांनी एकत्रित येवून तयार केलेल्या तलावांमुळे पावसाचे पाणी चांगल्या पध्दतीने साठवले गेले. याचा परिणाम जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यामध्ये झाल्याचे उदाहरण सर्वांसाठी प्रेरक आहे. जलाशय केवळ पाणी साठवण्याचे साधन नसून, ते स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्थेचे केंद्र बनत असल्याचा पंतप्रधान मोदी यांचा संदेश प्रेरणादायी असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
पाऊस जिथे पडेल आणि जेव्हा पडेल, तेव्हा तो साठवा, या ब्रीदवाक्यासह पावसाळी पाणी साठवणुकीसाठी रेन वॉटर हार्वेस्टींग करीता नागरिकांनी पुढाकार घेण्याचे प्रधानमंत्र्यांचे आजच्या भागातील आवाहन जलसंरक्षणा करीता नवी दिशा देणारे आहे. पाणी हे निसर्गाचे वरदान आहे आणि ते पुढील पिढीसाठी सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे आपण स्वच्छतेसाठी एकत्र आलो, त्याचप्रमाणे जल संरक्षणासाठी देखील गावोगावी जल समित्या कार्यरत करण्यासाठी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे शक्य आहे.
मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदीनी युवकांना आणि स्टार्टअप्सना जल व्यवस्थापनासाठी नवनवीन तांत्रिक उपाय शोधण्याचे प्रोत्साहन दिले आहे. जलशक्ती मंत्रालयाने सुरू केलेल्या विविध मोहीमा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जलसंपदा विभाग 15 एप्रिल पासून सुरू होणार्या जलपंधरवडा अभियानातून नागरिकांपर्यत पोहचविण्याचा तसेच जल संरक्षणात लोकशक्तीच्या सहभागाचा दिलेला मंत्र कृतीत उतरविण्याचा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.




