नाशिक । मानस जोशी Nashik
देशभरात नदी प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. देशातील अनेक नद्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या असतानाच नाशिकची दक्षिणवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या गोदावरीची ही अवस्था तशीच झाली आहे. नदीमध्ये दूषित पाणी मिसळत असल्याने गोदावरीचा श्वास कोंडला जात आहे. गोदावरी घातक जलपर्णींच्या विळख्यात अडकल्याने संपूर्ण पात्र हिरव्या रंगाचे दिसू लागले आहे. गोदीवरीमध्ये सातत्याने मिसळत असलेले दूषित पाणी आणि त्यामुळे तिचे वाढणारे प्रदूषण हे या जलपर्णी वाढण्याचे मुख्य कारण आहे.
महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक विकास महामंडळ यांच्या नाकर्तेपणामुळे गोदावरीला असलेला प्रदूषणाचा विळखा कायम असल्याचे निदर्शनास येत आहे. सोमेश्वर धबधब्यापासून ते थेट अहिल्याबाई होळकर पुलापर्यंत गोदापात्रात पाणवेलीचे दर्शन होत आहे. खासकरुन चोपडा लॉन्स येथील पूल आणि नवश्या गणपती परिसरात पाणवेलींचे प्रमाण मोठे आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
या वाढत्या प्रदूषणामुळे जलपर्णींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या पाणवेली सडल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच मासे व जलचरांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. या पाणवेली सडल्याने दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरुन विविध रोगराई निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोदापात्रात नाशिक शहराचे सांडपाणी सोडले जात असून प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई करण्यात येत नसल्याने नागरिकांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, गोदावरीच्या या पाण्यावर अनेक गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. हेच दूषित पाणी नाशिकच्या निफाड तालुक्यातील विविध गावच्या योजनांकरीता पुरवले जात आहे. याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे मानवता धर्म जोपासत नाशिक मनपाने सांडपाणी गोदावरीत न सोडता अन्यत्र विल्हेवाट लावावी अशी मागणी होत आहे.
वाढलेल्या जलपर्णींमुळे गोदापात्र पूर्ण झाकले गेले आहे. ज्यामुळे नैसर्गिक पानवेली, जलचर प्राणी, यांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश, ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांना धोका निर्माण झाला आहे. या नैसर्गिक प्रजाती नष्ट होण्याची भीती वाटत आहे. या जलपर्णी जर कमी प्रमाणात असतील तर त्याचा निसर्गचक्राला थोडा फायदा होतो. मात्र, मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्या घातक होत आहे. स्थिर पाण्यावर या जलपर्णी लवकर वाढतात. त्यामुळे जर नदीचा प्रवाह सतत चालू राहिला तर जलपर्णींची वाढ रोखणे शक्य आहे.
-डॉ. शिल्पा डहाके, नदी अभ्यासक
जलपर्णी आणि पानवेली या सहसा दोन वेगळ्या प्रकारात आढळतात. गोदापात्रावर वाढलेली ही जलपर्णी असून ही पानवेलींपेक्षा जास्त घातक आहे. ही प्रजाती साऊथ अमेरिकेतील अॅमेझॉन नदीपात्रात प्रामुख्याने आढळते. या प्रजातीला भारतात वॉटर हायसिंथ असे म्हणतात तर याचा वैज्ञानिक शब्द इकॉर्निया असा आहे. या जलपर्णींची वाढ ही खूप लवकर होते, जलपर्णीतून पडणार्या बियांमधून यांची झपाट्याने वाढ होते. यांची वाढ थांबवण्यासाठी एकतर त्यांना फुले येण्या आधीच त्या नष्ट केल्या पाहिजे. किंवा नदीतील पाणी हे सतत वाहते राहिले तर त्यांची वाढ रोखता येईल. नदीत मिसळणारे लिड, पारा, सल्फर यांसारखे रसायने हे त्यांचे प्रमुख उत्पत्तीचे खाद्य असल्याने ते पाण्यात मिसळण्यापासून रोखल्यास जलपर्णींची वाढ रोखणे शक्य आहे.
-डॉ. के.व्ही.सी. गोसावी, डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, एचपीटी आरवायके कॉलेज
गोदावरी पात्रातील वाढणार्या जलपर्णी काढण्याचे काम हे सातत्याने सुरु आहे. सन 2019-20 मध्ये महापालिकेने ट्रॅशस्किमर हे अद्ययावत मशिन स्मार्ट सिटीकडून खरेदी केले आहे. जिथे नदीपात्रात जास्त पाणी आहे, तिथे या मशीनद्वारे पाण्यावरील जलपर्णी काढण्यात येते, तर जिथे पाण्याची पातळी कमी आहे तिथे जेसीबीद्वारे जलपर्णी काढण्यात येते. पावसाळ्याआधी नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी नदीत सोडल्या जाणार्या सांडपाण्याचे महापालिकेकडून नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेतर्फे पाच लाख 39 हजार 690 किलो जलपर्णीं जमा करुन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे गोदापात्रामध्ये प्रदूषण करणे, नदीपात्रात कपडे धुणे, गाड्या धुणे, निर्माल्य टाकून अस्वच्छता करणार्यांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.
– विजयकुमार मुंडे , उपायुक्त, नाशिक मनपा