Friday, May 3, 2024
Homeनगरउशिराने सुरू झालेला पावसाळा लांबणार?

उशिराने सुरू झालेला पावसाळा लांबणार?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

वातावरणातील बदलाचा परिणाम म्हणून डिसेंबरपर्यंत ठिकठिकाणी कमीजास्त प्रमाणात ढगफुटीसद़ृश पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीसह मोठी गारपीट होण्याचा धोका आहे, त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगावी तसेच पावसाळा डिसेंबरपर्यंत लांबू शकतो, असा अंदाज जलसंपदाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा हवामानाचे जाणकार उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

मागील काही वर्षांपासून तिनही हंगामाच्या सिमारेषा अंधुक होत असून वेळापत्रकात बराचसा बदल होत आहे. उशिराने सुरू झालेला पावसाळा लांबताना दिसत आहे. हिवाळा व उन्हाळ्याचा कालावधी काहीसा कमी होत आहे. हिवाळ्यातील थंडी व उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता वाढत आहे. पावसाळा जुलैमध्ये सुरू होऊन कमी जास्त प्रमाणात डिसेंबरपर्यंत लांबेल अशी सध्याची परिस्थिती आहे. अर्थातच याचा पारंपरिक शेतीला मोठा फटका बसणार आहे. सध्या आणि भविष्यातही काही भागात अतिवृष्टी तर काही भागात कमी पाऊस अशी विषमता प्रकर्षाने दिसणार आहे.

यावर्षी गतवर्षीपेक्षा बिकट परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून भारतासह विविध देशात ढगफुटींच्या घटना सतत होत आहेत तर उत्तर प्रदेश बिहार मध्ये फक्त साठ टक्के पाऊस पडलेला आहे. मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. मान्सूनमध्ये होत असलेल्या बदलाचा दीर्घकालीन अचुक अंदाज वर्तवणे अवघड होत आहे. यावर्षी हवामान खात्याला जुन पासून वेळोवेळी वर्तवलेल्या अंदाजापासून घुमजाव करावे लागले आहे. आता सुध्दा परतीच्या मान्सून संदर्भात हवामान खात्याला निश्चितपणे अंदाज देता आलेला नाही. दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनार्‍यानजीक ला निना निर्माण होत असल्याने परतीच्या मान्सुनचे वेळापत्रक पुढे सरकेल असे चित्र आहे.

एकंदरीत या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून पावसाळा डिसेंबरपर्यंत लांबण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर प्रमाणेच डिसेंबरपर्यंत वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी वा ढगफुटी सदृश्य पाऊस होत राहील. आज जरी निश्चितपणे सांगता येत नसले तरी जानेवारी महिन्यात सुध्दा पाऊस पडला तर आश्चर्य वाटु नये. दरवर्षी सातत्याने ढगफुटी वाढत असताना विजा पडण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणून जीवित हानी होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

सर्वसाधारणपणे पावसाच्या थेंबाचा ताशी वेग 12 किमी असतो. परंतु ढगफुटी मध्ये तो वेग वाढून ताशी 80 किमी पर्यंत जातो. पावसाच्या धारांना अधिक वेग असल्याने झाडे, लहान प्राणी, कच्च्या इमारती, शेती, पिके, रस्ते यांना मोठी हानी पोहोचते. गारा असतील तर हानीचे प्रमाण वाढते. जिकडे तिकडे पुरासारखी स्थिती निर्माण होते. पाणी वाहुन नेणारे ओढे नाले यांच्या पात्राची तसेच पाझर तलाव, धरणे, छोटे मोठे बंधारे यांच्या सांडव्यांची वहन क्षमता कमी पडुन बंधारे फुटतात व महापुराची स्थिती निर्माण होते. सततच्या पावसामुळे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचे वेळापत्रक बिघडु शकते. द्राक्ष, डाळिंब यासारख्या फळबागांसह अन्य पिकांनाही मोठा फटका बसून कोट्यवधी रुपयांच्या हानीची शक्यता आहे.

नवनवीन विषाणू तसेच जिवाणू साठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याने नवीन रोग तसेच साथीचे आजार निर्माण होत आहे. त्याचा प्राणी व वनस्पती सृष्टीवर विपरीत परिणाम होत आहे. यावर्षी पाकिस्तानातील जकोबाबाद येथील 52.8 डिग्री तापमान हा विक्रम आहे. स्पेन, इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल या सारख्या युरोपियन देशात उन्हाळ्यात सरासरी 20 डिग्री असलेले तापमान 40 ते 50 डिग्रीवर जाणे, पाकीस्तानात आणिबाणी जाहीर करण्याची वेळ ओढणारी विक्रमी ढगफुटी आणि महापुर हे सारे काही बदलत्या हवामानाची झलक आहे. ढगफुटी मुळे लेह येथे एका तासात 2880 मिमी पडलेल्या पावसावरुन ढगफुटीची भीषणता लक्षात येते. हरितगृह परिणामासोबतच सुर्यावरील वाढत्या चुंबकीय वादळामुळेही या हवामान बदलास गती मिळत आहे.

सध्याच्या पावसातील मुख्य बदल म्हणजे क्युम्युलोनिंबस पध्दतीने पडणार्‍या पावसाच्या प्रमाणात फार मोठ्या प्रमाणात झालेली वाढ हा होय . क्षणात काळ्याकुट्ट लोंबणार्‍या ढगांमुळे अंधारुन येणे आणि अक्षरशः धो धो पाऊस ओतला जाणे आणि तासाभरात आकाश पुन्हा निवळले जाणे, असे याचे स्वरुप असते. सद्यस्थितीत या परिस्थितीचा सामना केल्याशिवाय पर्याय नाही. या सर्व घटकांचा एकात्मिक अभ्यास होऊन आवश्यक त्या तातडीच्या व दिर्घकालीन उपाययोजना अंमलात आणण्याची गरज आहे, असे मतही श्री. निर्मळ यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या