Friday, May 17, 2024
Homeअग्रलेखशपथविधीचा स्वागतार्ह नवा पायंडा!

शपथविधीचा स्वागतार्ह नवा पायंडा!

भारतीय प्रजासत्ताकाने त्र्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या काही काळात देशात काही ठळक बदल घडले आहेत. त्याचा स्वीकार भारतीयांनी आता केला आहे. पूर्वी बँकेत खात्यावर पैसे भरणे असो अथवा पैसे काढणे; प्रत्येक कामासाठी खातेदारांना बँकेत जाणे अनिवार्य होते. आता मात्र बँकेत न जाताही लोक घरबसल्या स्वतःच्या खात्याचे व्यवहार करू शकतात. एकमेकांना ऑनलाईन पैसे पाठवू शकतात. वस्तूंची खरेदी आणि विक्रीही स्वतःच्या मोबाईलवरून करू शकतात. देशाचा अर्थसंकल्प संसदेत पूर्वी २८ फेब्रुवारीला सायंकाळी सादर होत असे. आता तो १ फेब्रुवारीला सकाळी सादर केला जातो. सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनातील असे अनेक बदल लोकांनी मान्य केले आहेत. स्वीकारले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नव्या डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या पारंपरिक शपथेबाबत असाच एक बदल करण्याचा निर्णय देशाच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नुकताच जाहीर केल्याची बातमी माध्यमांत प्रसिद्ध झाली आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राला सुमारे दोनशे वर्षांची परंपरा आहे. भारतात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या आणि वैद्यकीय व्यवसायात पदार्पण करण्यास सज्ज झालेल्या नव्या डॉक्टरांना एक शपथ घ्यावी लागते. ती ग्रीक पद्धतीची आहे. देवांना साक्ष ठेऊन रुग्णांची सेवा आपल्या कुटुंबाप्रमाणे करण्याची ग्वाही त्या शपथेत दिली जाते. ग्रीक फिजिशियन हिप्पोक्रेट्स यांच्या नावाने ती दिली जाते. तिला ‘हिप्पोक्रेट्स ओथ’ असे म्हटले जाते. ही शपथ मूळ ग्रीक भाषेतील असली तरी ती इंग्रजी भाषेतून दिली जाते. मात्र ही शपथ आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निर्णयानुसार एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना ‘हिप्पोक्रेट्स ओथ’ऐवजी भारतीय आयुर्वेदातील ‘चरक संहिते’चे निर्माते महर्षीं चरक यांच्या नावाने शपथ घ्यावी लागणार आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची बैठक वैद्यकीय आयोगाने अलीकडेच बोलावली होती. त्या बैठकीत शपथ बदलाची माहिती दिली गेल्याचे सांगितले जाते. सर्व महाविद्यालयांना त्या बदलाबाबत कळवण्यातही आले आहे. १४ फेब्रुवारीला सुरू होत असलेल्या नव्या शैक्षणिक वर्षांपासून या नव्या बदलाची सुरूवात होणार आहे. आधुनिक वैद्यक शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना आयुर्वेदातील महर्षींच्या नावाने शपथ दिली जाणार ही बाब काहीशी अचंबित करणारी वाटत असली तरी आजवर विदेशी वैद्यकतज्ज्ञाच्या नावाने शपथ दिली जात होती. त्यापेक्षा स्वदेशी, शाश्वत आणि सर्वमान्य प्राचीन वैद्यकशास्त्र असलेल्या आयुर्वेद महर्षींच्या नावे शपथ घेणे केव्हाही चांगले! किंबहुना वैद्यकीय सेवेत पदार्पण करण्यापूर्वी महर्षी चरक यांच्या नावे शपथ घेणे ही गौरवास्पद बाब असल्याची मते अनेक तरूण डॉक्टर व्यक्त करतील. याशिवाय नव्या डॉक्टरांना योगाचा परिसस्पर्श व्हावा या उद्देशाने त्यांना दहा दिवस योगाभ्यासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे हे दोन्ही निर्णय स्वदेशीचा पुरस्कार करणारे आणि देशातील परंपरांचा अभिमान बाळगणारे आहेत. बदलत्या काळानुसार काही प्रथा-परंपरा, रूढी-चालीरीती बदलल्या पाहिजेत, असे जाणते सांगतात. तथापि प्रचलित प्रथा-परंपरा बदलाला सहसा कोणताही समाज राजी होत नाही. अगदी उच्चशिक्षितसुद्धा पूर्वापार चालत आलेल्या गोष्टींना विरोध न करता त्या तशाच पुढे चालू ठेवणे योग्य समजतात. तसेच बदल स्वीकारायलादेखील सहजासहजी कोणी तयार नसते. नव्या गोष्टी रूढ केल्या जात असतील तर त्याला विरोध केला जातो. अशा बदलांना विरोध करणे हादेखील पायंडाच पडला आहे. कधी-कधी मात्र बदल स्वीकारायला परिस्थितीच भाग पाडते. विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागेल असे कोणाला कधी वाटले होते का? अशी कल्पना कोणी स्वप्नातही केली नसेल, पण करोना महासाथीने व्यक्तिगत जीवनापासून सार्वजनिक जीवनापर्यंत कितीतरी बदल घडवले. अनेक नव्या गोष्टींचा अंगिकार काळाची गरज म्हणून जगभरातील लोकांना करावा लागला. तोंडावर मुसके, सुरक्षित अंतराचे पालन, स्वच्छदकाचा (सॅनिटायझर) वापर करावा लागेल, असे कोणाला वाटले होते का? पण करोनाने असे बदल करायला भाग पाडलेच ना? रेल्वेत ‘रेल्वे गार्ड’ असे पद होते. त्याऐवजी ‘रेल्वे व्यवस्थापक’ (रेल्वे मॅनेजर) असे त्याचे नामकरण नुकतेच करण्यात आले आहे. नव्या भारताचा जयजयकार सध्या सर्वत्र केला जात आहे. येत्या काळात देशात असे अनेक नवनवे बदल घडलेले पाहावयास मिळतील. त्याबद्दल आश्चर्य बाळगण्याचे कारण नाही. चांगल्या बदलांचे स्वागत करण्याची भूमिका भारतीय समाजाने नेहमीच ठेवली आहे. तशी ती यापुढेही ठेवली जाईल यात दुमत नसावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या