मुंबई | Mumbai
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे काल निकाल लागले. या निवडणुकीत ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. मुळातच दोन्ही पक्षांनी आणि त्यांच्या सर्वोच्च नेतृत्त्वाने ही निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नव्हती. ही निवडणुक उध्दव ठाकरेंनी त्या त्या भागातील स्थानिक नेत्यांवर सोपावली होती. राज आणि उद्धव ठाकरे दोघेही नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांप्रमाणे मैदानात उतरले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षांना फारसे यश मिळालेली नाही. मात्र, ठाकरे बंधुंनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर युती आणि आघाडी करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा कधी होणार? याकडेही अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले आहे. कारण मागील काही दिवसांपासून ठाकरे गट आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत.
युतीची घोषणा धुमधडाक्यात, वाजतगाजत केली जाईल
यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 22 डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या घोषणेबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊतांनी म्हटले की, “दोन भावांची युती झालीय, मनोमिलन झालं, एकत्रिकरण झालेले आहे. आता राजकीय युती महापालिकेसाठी म्हणाल तर मुंबईसह इतर नाशिक, कल्याण-डोंबिवली, ठाणे या ठिकाणच्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणच्या चर्चा या आता संपलेल्या आहेत. तरीही इतक्या मोठ्या महापालिका आहेत. शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो. त्या दृष्टीने काम सुरू आहे. २३ तारखेपासून अर्ज भरण्यास सुरुवात आहे. पण त्याआधी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धुमधडाक्यात, वाजतगाजत केली जाईल, असे संकेत खासदार राऊतांनी दिले आहेत.
“मी तुम्हाला कालही सांगितले की हा एक नवीन प्रयोग आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष हे एकत्रित निवडणूक लढणार आहेत. आम्ही फक्त मुंबईतच एकत्रित निवडणूक लढणार नाही तर तर ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नाशिकमध्येही आम्ही एकत्रित लढणार आहोत”, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
नाटक नसून प्रीतीसंगम
तर, आम्ही जे काही करतोय ते नाटक नसून प्रीतीसंगम आहे आणि महाराष्ट्राची जनता ही प्रीतीसंगमामध्ये सहभागी होईल. नाटक कुठले आहे, तर काल जे नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले ते नाटक आहे. ज्या पद्धतीने चांगल्या नाटकाची तिकिटे ही तिकिट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकिटे मालक स्वतः खरेदी करून रिकाम्या थेटरपुढे आमचा शो हाऊसफुल्ल असल्याचे नाटक करतात. कालचा शो हाऊसफुल्ल नव्हता. पण त्यासाठी प्रचंड पैसे खर्च करून तिकिटे खरेदी केली गेली आणि विकत दिली गेली आणि कालचा निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे, कसा लावला गेला, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





