Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याठिकठिकाणचा पार्किंग प्रश्न कधी मार्गी?

ठिकठिकाणचा पार्किंग प्रश्न कधी मार्गी?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील ( Nashik City )गंगापूररोड, कॉलेजरोड, आनंदवली परिसर, महात्मानगर परिसर, पाटील गल्ली आदी परिसरात पार्किंगची ( Parking )जटिल समस्या कायम आहे. या ठिकाणी अनेक मोठे शोरूम तसेच व्यावसायिकांची ऑफिसेस आहेत. मात्र प्रशासनाच्या वतीने या संपूर्ण परिसरात पाहिजे त्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था केली नसल्यामुळे अनेक ठिकाणी लहान, मोठ्या गाड्या थेट रस्त्यावर पार्क करण्यात येतात. यामुळे वाहतूककोंडी होते, तर नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो.

- Advertisement -

नाशिक शहरात तसे पाहिले गेले तर वाहने लावण्यासाठी मुबलक प्रमाणात पार्किंगची व्यवस्था आत्तापर्यंत प्रशासनाने केलेलीच नाही. नाशिक शहराचा ज्या प्रमाणात झपाट्याने विकास झाला आहे, त्यामानाने वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे मुख्य रस्त्यांवर गाड्या उभ्या करण्याची एक प्रकारे परंंपरा सुरू झाली आहे. नाशिक शहरातील गावठाण भागासह नवीन वस्तीमध्ये देखील हीच समस्या कायम आहे.

यामध्ये नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागात देखील समस्या आहे. कायद्यानुसार इमारत तयार करताना पार्किंगची जागा सोडणे गरजेचे असले तरी काही ठिकाणी इमारती उभ्या राहिल्यानंतर पार्किंगच्या जागांवर देखील अतिक्रमण झाल्याचे दिसून येत असते. मात्र, अशा इमारती शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडे विशेष यंत्रणा नसल्यामुळे अनेक इमारती तयार झाल्यावर पार्किंगची जागाच नष्ट होते. परिणामी इमारती किंवा व्यावसायिक इमारतीत बाहेरून येणार्‍या लोकांना वाहने रस्त्यावर उभी करून संबंधित इमारतीत जावे लागते, दुसरीकडे नाशिक वाहतूक पोलिसांच्या मार्फत नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन पार्क केल्यावर क्रेनच्या साह्याने ते उचलण्याची कारवाई देखील होत असते.

एकीकडे गाड्या लावण्यासाठी जागा नाही व दुसरीकडे पार्किंगच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यात आले नसल्यामुळे नाइलाजस्तव नागरिकांना रस्त्यांवर गाड्या उभ्या करण्याची वेळ येते. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांना आर्थिक दंड सोसावा लागतो. तरी महापालिका प्रशासनाने नवीन इमारती तयार झाल्यानंतर जी परिस्थिती असते तीच परिस्थिती कायम आहे का, यासाठी अशा इमारतींमध्ये नियमित पाहणी करून पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण झाले नाही ना याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पार्किंगसाठी स्वतंत्र जागा देखील उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या