Wednesday, May 8, 2024
Homeअग्रलेखकायद्यांचा आदर कधी करायला शिकणार?

कायद्यांचा आदर कधी करायला शिकणार?

पादचारी मार्ग (फुटपाथ) (sidewalk) हे नागरिकांना चालण्यासाठी असतात याची आठवण मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला नुकतीच करुन दिली. पादचारी मार्गांवरुन चालण्यासाठी जागाच शिल्लक नसते. त्यामुळे लोक रस्त्यांवरुन चालतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. लोकांचा जीव धोक्यात येतो.

पादचारी मार्ग (sidewalk) मोकळे करण्यासाठी काय धोरण आखले आहे असाही प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. हा प्रश्न जरी मुंबई महानगरपालिकेला विचारला गेला असला तरी पादचारी मार्गांवरचे अतिक्रमण ही सार्वत्रिक समस्या आहे. गाव किंवा शहरातील रस्ता कोणताही असो, अतिक्रमित पादचारी मार्ग आणि वाहनांच्या गर्दीत जीव मुठीत धरुन रस्त्याने चाललेले नागरिक हे सगळीकडचे सामान्य दृश्य आहे. अमूक एका ठिकाणचा पादचारी मार्ग नागरिकांना चालण्यासाठी मोकळा आहे असे छातीठोकपणे सांगितले जाऊ शकेल का? पादचारी मार्गांची सद्यस्थिती कायद्यातील तरतुदींशी विसंगत असू शकते अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.

- Advertisement -

हेच या समस्येचे मुळ असू शकेल का? नियम किंवा कायदे पाळण्यासाठी असतात याचा विसर सर्वांनाच पडला असावा का? ती जाणीव जोपर्यंत करुन दिली जात नाही तोपर्यंत परिस्थितीत बदल होऊ शकेल का? पादचारी मार्ग हे नागरिकांना चालण्यासाठी निर्माण केलेले असतात. किंबहुना तो नागरिकांचा हक्का मानला जातो. ही फक्त नागरिकांचीच अडचण नाही, तर पादचारी मार्गांचे दुखणे सामाजिक पातळीवरच्या अनेक दुखण्यांना जन्म देते. तरीही त्याकडे दुर्लक्ष कसे केले जाते? पादचारी मार्गांवर फक्त बेकायदा दुकाने लावली जातात का? अनेक नागरिकही त्यावर बेकायदा वाहने उभी करतात. वाहतूक जाम झाली की काही वाहनचालक सर्रास पादचारी मार्गावरुन वाहने हाकतात. नियमांचे पालन केले नाही तरी फारसे काही बिघडत नाही असा भ्रम निर्माण झाला आहे. किंबहुना नियम मोडणे हाच नागरिकांना त्यांचा हक्क वाटू लागला असावा. याची अनेक उदाहरणे सांगता येतील.

सिग्नलवर काळेपांढरे पट्टे (झेब्रा क्रॉसिंग) असतात. वाहने त्या पट्ट्यांवर उभी करु नयेत आणि पादचार्‍यांनी त्याच पट्ट्यांवरुन रस्ता ओलांडावा असे फलकही काही ठिकाणी लावलेले असतात. वाहनचालक आणि नागरिकही त्याकडे दुर्लक्ष करतात. वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्यास नियमाने बंदी आहे. तो नियम किती जण पाळतात? सोलापूरमध्ये भाविकांच्या एका खासगी गाडीला नुकताच अपघात झाला. वाहनचालक मोबाईलवर बोलत वाहन चालवत होता असे जखमींनी माध्यमांना सांगितले. तेव्हा, नियम हे दुसर्‍यांनी पाळण्यासाठी असतात असे सर्वांनाच वाटते.

ज्यांच्यासाठी नियम बनवले गेले ते नियम गुंडाळून ठेवतात. ज्यांच्यावर नियमपालन करायला लावण्याची जबाबदारी आहे असे मानले जाते ते नियमभंगाकडे डोळेझाक करतात. जे कायदे निर्माण करण्याला हातभार लावतात तेही याकडे कानाडोळा करत असावेत का? कायद्याचा आदर करायला समाज कधी शिकेल? कायद्यांचा धाक कधी निर्माण होणार? राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत हक्कांविषयी नेहमीच बोलले जाते. तथापि रोजच्या घटनांसाठी जे नियम बनवले गेले ते का पाळले जात नाहीत याचा कधीतरी शोध घेतला जाईल का? कायदे पालन हाही समस्या निराकरणाचा एक मार्ग आहे याचा गांभिर्याने विचार केला जायला हवा. 

- Advertisment -

ताज्या बातम्या