Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखविद्यार्थ्यांच्या अस्वस्थतेला खरे जबाबदार कोण?

विद्यार्थ्यांच्या अस्वस्थतेला खरे जबाबदार कोण?

मुंबई, पुणे आणि नागपूरमधील विद्यार्थ्यांच्या आकस्मिक आंदोलनाने शैक्षणिक क्षेत्रातील अस्वस्थतेला विचित्र आणि घटनाबाह्य पद्धतीने वाट फुटली आहे. या तीनही ठिकाणी अचानक हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी त्यांनी आंदोलन सुरु केले. बघता बघता या आंदोलनाला हिंसक वळण लागले. विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी सुरु केली. पोलिसांना विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार करावा लागला. आंदोलक विद्यार्थ्यांनीही पोलिसांवर दगडफेक केली. विद्यार्थ्यांना विकास पाठक नावाच्या तरुणाने भडकवल्याचे माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. त्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो समाजमाध्यमात ‘हिंदुस्थानी भाऊ’ नावाने प्रसिद्ध आहे. त्याला हजारो अनुयायी असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाचा पूर्ण छडा लावला जाईल असे राज्याच्या गृहमंत्र्यांनी जाहीर केले आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील. गुन्हा सिद्ध झाला तर विकास पाठकवर यथावकाश कारवाई देखील होईल. तशी ती व्हायलाही हवी. कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणे हा गुन्हाच आहे. तो करणाराला शासन व्हायला हवे. तथापि या आंदोलनाने अनेक प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. मोबाईल आणि समाजमाध्यमामुळे तरुण पिढी भरकटली आहे हा आक्षेप नेहमीच घेतला जातो. विकास पाठक विद्यार्थ्यांना भडकावत आहे हे गुप्तचर यंत्रणेच्या लक्षात का आले नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. समाजमाध्यमांच्या प्रभावाचाही मुद्दा चर्चेत आहे. अशा आक्षेपांवर चर्चा व्हायला हवीच. तथापि विकासच्या आवाहनाला हजारो विद्यार्थ्यांनी प्रतिसाद का दिला असावा? विकास मुंबईत राहातो. मुंबईतील विद्यार्थ्यांसमोर तो प्रत्यक्ष हजर असू शकेल. पण पुणे आणि नागपूरमध्ये मात्र तर तो नसावा. तरीही या दोन्ही ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर कसे उतरले? विशेषतः करोनाच्या दोन वर्षात विद्यार्थी आणि शिक्षणक्षेत्रात कमालीची अस्वस्थता आहे हा याचा साधा सरळ अर्थ आहे. ही अस्थिरता का निर्माण झाली? विद्यार्थ्यांचा भवितव्याशी कोणीही खेळू नये असे आवाहन राजकीय नेत्यांनी केले आहे. पण हा खेळ चालवला कोणी? याचा शोध नेत्यांना घ्यावासा वाटतो का? नेत्यांनी केलेले आवाहन यंत्रणेला आणि शिक्षणक्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनाही लागू आहे याचा विसर त्यांना पडला असावा का? निर्णयातील धरसोडवृत्ती, ते जाहीर करण्याची आणि मागे घेण्याची घाई आणि जवळपास दीड वर्षे बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये यामुळे शिक्षणक्षेत्रात अस्वस्थता आहे याकडे शिक्षणतज्ञ लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. तरीही गोंधळ करणारेही तितक्याच निष्ठेने गोंधळ वाढवत आहेत. विद्यापीठांच्या सत्र परीक्षा १५ फेब्रुवारीनंतर ऑफलाईन घेण्यास परवानगी असल्याचे राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केले. तथापि विद्यापीठाने मात्र या परीक्षा ऑनलाइनच होतील असे जाहीर केले आहे. ऑनलाइन परीक्षांची तयारी पूर्ण केल्याने त्यात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल. लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाईल असे राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी नुकतेच जाहीर केले. करोनाला अटकाव करण्याचा लसींचे डोस घेणे हाच सध्याचा उपलब्ध पर्याय आहे. पण राज्यात कोट्यवधी विद्यार्थी शिकतात. त्यांचे सर्वांचे लसीकरण पूर्ण झाले आहे असे मंत्र्यांना वाटते का? कालच्या दिवसात जाहीर झालेले हे काही निर्णय विद्यार्थ्यात गोंधळ निर्माण करणारे नाहीत असे अधिकारी तरी ठामपणे सांगू शकतील का? गेल्या दोन वर्षात असे कितीतरी निर्णय घेतले गेले आणि त्यातील अनेक मागेही घेतले गेले. अशा परिस्थितीत कोणा अनोळखी ‘भाऊ’च्या मागे विद्यार्थ्यानी भाऊगर्दी केली की अशीच एखादी भाऊगर्दी एका भाऊच्या नावाखाली विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढवत असेल का? करोना कधीही संपणार नाही असे तज्ञ म्हणतात. मग शिक्षणक्षेत्रातील गोंधळही मागच्या पानावरुन पुढे सुरूच राहील का? या गोंधळाला विद्यार्थी कमीत कमी जबाबदार आहेत. आणि गोंधळाचे दुष्परिणाम मात्र त्यांनाच जास्त भोगावे लागत आहेत. तापल्या तव्यावर पाणी ओतले की त्याची वाफच होते’ तसे शैक्षणिक भविष्याच्या काळजीने विद्यार्थ्यांची डोकी आधीच काहीशी तापली होती. या अस्वस्थतेचा गैरफायदा एका हिंदुस्थानी भाऊने घेतला. तो भाऊ हिंदुस्थानी असो की पाकिस्तानी, त्याला आणखीही काही नावे नेते मंडळी आपापल्या सोयीने देतच राहातील. तथापि काल-परवाच्या आंदोलनाचे खापर एका भाऊच्या डोक्यावर फोडून यंत्रणेला मोकळे होता येईल का? शिक्षण क्षेत्रातील या अस्वस्थतेला कोणत्या यंत्रणा किती प्रमाणात जबाबदार आहे हे तरी लोकांना कळू द्या. दरवेळी नवनवे गोंधळ निर्माण करणे एवढेच यंत्रणेचे काम असेल तर मात्र यंत्रणेला त्या उद्योगात चांगलेच यश मिळत आहे हे वास्तव नाकारता येईल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या