Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला? - काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा सवाल

शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला? – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा सवाल

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका ही शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू नये. सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पाळणे सरकारचे नैतिक आणि राजकीय कर्तव्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी समिती कशाला, असा सवाल करत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समिती स्थापन करण्याची नौटंकी करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी शनिवारी केली.

- Advertisement -

बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यात उपोषण सुरू केले होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडू यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर बोलताना थोरात यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली.

YouTube video player

आज सरकारकडे लाखो कोटी रुपयांचे महामार्ग आणि विविध प्रकल्प उभारण्यासाठी पैसे आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारी तिजोरी रिकामी असल्याचा देखावा केला जात आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी समिती कशाला पाहिजे? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी समिती नाही, नियत लागते. या आगोदरही विविध आंदोलने दडपण्यासाठी सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी केलेली आहे. पुढे त्याचे काय झाले हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, अशी टीका थोरात यांनी केली.

यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला आहे. ज्वारी, बाजरी, कांदा, भाजीपाला, फळबागा, कापूस, धान आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभरात एकच पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तर ही परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे. दुसरीकडे बँकांकडून शेतीसाठी कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे, असेही थोरात म्हणाले.

सरकारने फसवाफसवी थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. कर्जमाफीशिवाय आता पर्याय नाही. काँग्रेस पक्षाची देखील हीच भूमिका आहे. त्यामुळे समितीचे सोहळे करण्याऐवजी सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी. अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक रोखणे कठीण होईल, असाही इशारा थोरात यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २४ जानेवारी २०२६ – पुन्हा पुन्हा भयंकर

0
पुन्हा एकदा बदलापूर घटनेने लोक हादरले आहेत. चार वर्षाच्या चिमुकलीच्या विनयभंगाचा प्रकार उघडकीस आला. नर्सरीत शिकणारी ती नेहमीच्या वेळेपेक्षा उशीरा भेदरलेल्या अवस्थेत घरी आल्याने...