मुंबई | Mumbai
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिंदे सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं, तर ठाकरे बंधूंना धक्का बसला. यानंतर आता मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. मुंबईच्या महापौरपदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बोलणी सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महापौरपदाच्या निवडणुकीवेळी ठाकरेंचे ६५ नगरसेवक गैरहजर राहणार असल्याचे बोलले जात आहे. तर यासाठी भाजप आणि शिवसेना ठाकरे यांच्यात बोलणी सुरु असल्याचे चर्चा सुरु आहे. आता यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दोघांनी एकमेकांशी काय सौदेबाजी करायची ती खुशाल करा
सुषमा अंधारे यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्या पोस्टमध्ये म्हणाल्यात, शिंदे आणि फडणवीस या दोघांची महापौर पदावरून चाललेली रस्सीखेच माध्यमांमध्ये रंगत आहे. यात दोघांनीही ठाकरेंना मध्ये ओढण्याचे कारण नाही. शिंदे फडणवीस या दोघांनी एकमेकांशी काय सौदेबाजी करायची ती खुशाल करावी. स्वतःचा मोलभाव वाढवण्यासाठी ठाकरेंना ऑफर किंवा ठाकरेंकडून प्रस्ताव अशा पद्धतीचे लुटूपुटुचे डाव खेळू नयेत. तुम्हाला टीका करायलाही ठाकरे आणि सत्तेत बसण्यासाठी एकमेकांवर दबाव तंत्र वापरण्यासाठीही ठाकरे कार्ड का वापरावे लागत आहे? असा सवालही सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.
आम्ही लढतोय लढत राहू…याल तर तुमच्यासह…
पुढे अंधारे म्हणाल्या की, ठाकरेंचे नगरसेवक कुठेही नॉटरीचेबल नाहीत. त्यांना कुठल्याही हॉटेलमध्ये डांबून ठेवलेले नाही. ठेवायची गरज नाही. त्यामुळे टेबल न्यूज पेरण्याचा बालिश प्रयत्न कोणीही करू नये, लोकांनी ज्या विश्वासाने आम्हाला मते दिलेली आहेत तो विश्वास आमच्यासाठी सत्तेपेक्षा लाखमोलाचा आहे..! आम्ही लढतोय लढत राहू.. ! याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय..!! असेही त्यांनी म्हटले आहे.
BJP Mumbai: मुंबईत महापौर पदावरुन हालचालींना वेग; भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना महत्वाचा आदेश
आम्ही सुत्रांवर विश्वस ठेवत नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “अशा सूत्रांवर आम्ही विश्वास ठेवत नाहीत.”




