– अलका दराडे
घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…
मी माहेरी व सासरी सर्व नात्यांबरोबर मोकळेपणाने रमले आहे. या नात्यांनी मला नुसते प्रेमच नाही दिले तर जगण्यास अखंड ऊर्जा दिली. ही नाती निभावताना आपली अनेक कर्तव्ये असतात व त्यात गुंता न होता सहजपणे निभवावी लागतात. या सर्व नात्यांमधे माझे एक गोड नाते माझ्या आजीशी होते. आजीच्या सावलीत मी वेलीसारखी हळूवारपणे वाढले. तिचा हवाहवासा सहवास म्हणजे माझ्यासाठी आनंदोत्सव असे. मी वाड्यात पोहोचले की तिच्या चेहर्यावर आनंद पसरे नि तिचा हसरा चेहराच माझे स्वागत करी. आम्ही आजीला आईच म्हणायचो कारण वडील आई म्हणत. माझ्या आजीचे नाव गंगा होते. तिला गावात खूप मान होता. सारे गाव तिला मोठेपणा देऊन गंगाई म्हणायचे. माझी गंगाई दिवसभर काम करायची. मी पण तिच्याबरोबर सगळी कामे करत असे. तिने लाड खूप केले पण वळनही लावले. आजी गाणेही गुणगुणायची. आपल्या बारीक गोड आवाजात ती आपल्याच नादात काम करताना कधी कधी गाणे म्हणायची. म्हणजे गाणे म्हणणे हा तिचा छंद ती सुंदररीत्या जपत होती. मला फार मजा वाटायची ऐकायला. भल्या मोठ्या वाड्यात आजी एकटीच राहायची पण हिंमतीची होती. माझ्या गंगाईने मला प्रेम, माया, कष्ट अशा अनेक गोष्टी तिच्याही नकळत शिकवल्या. आजीविषयी लिहिताना मला आनंद मिळतो म्हणून अनुभवाच्या बोलातून मी सांगते की, मुलांची आजी दुसर्या गावाला राहत असेल तर आपल्या मुलांना तिच्याकडे पाठवा. आजी म्हणजे चालतीबोलती शाळा आहे. या शाळेत तुमच्या मुलांना जीवनाचे तत्त्वज्ञान मिळेल. तिचे खरे अनुभव काळ्या दगडावरील रेषेसारखे स्पष्ट व दगडासारखेच घट्ट असतात. या तिच्या अनुभवांमधून मुलांना शिकवण मिळेल. तिचा मायेचा पाझर म्हणजे नातवंडांसाठी अमृतानुभव आहे. खूप संवाद घडत मी व आजीमध्ये तसेच तुमच्याही मुलांचे घडू द्या.
आजी आणि नातवंडे यांच्यात जेव्हा मायेने संवाद घडतात ते पाहून मुलांचे आई- बाबाही आनंदी होतात. त्यांना माहीत असते की आजीइतके चांगले संगोपन कोणी करू शकणार नाही इतका त्यांचा आजीवर दृढ विश्वास असतो.
क्रमशः