अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
लग्नानंतर सातत्याने शारीरिक-मानसिक छळ, मारहाण, शिवीगाळ, पैशांची मागणी केल्याप्रकरणी एका विवाहित महिलेने आपल्या पतीसह सासू, सासरे आणि दोन नातेवाइकांविरूध्द गंभीर आरोप करत तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी (29 नोव्हेंबर) फिर्याद दाखल केली आहे. येथील रेणुकानगर परिसरात राहणार्या 28 वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून पाच संशयितांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पती शैलेश ललित गोहिल, सासू नंदा ललित गोहिल, सासरे ललित गोहिल (तिघे रा. आनंदनगर, मुंबई), नातेवाईक जयश्री हिरू तेजवाणी व हिरू तेजवाणी (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. फिर्यादीचा विवाह 28 नोव्हेंबर 2023 रोजी शैलेश गोहिल याच्याशी झाला. विवाहानंतर दीड महिना सासरी सर्व काही सुरळीत असले तरी 15 जानेवारी 2024 (मकरसंक्रांत) पासून छळाची मालिका सुरू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सण साजरा करण्याविषयी बोलल्याचा राग धरून पतीने मारहाण केली तर सासू-सासर्यांनी शिवीगाळ करून जीवाची धमकी दिल्याचा आरोप आहे. तेजवाणी नावाच्या नातेवाइकांनीही वारंवार फिर्यादीला घालून-पाडून बोलत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पती-सासरकडून वेळोवेळी शारीरिक-मानसिक छळ, उपाशी ठेवणे, सतत शिवीगाळ, अपमानास्पद वक्तव्ये आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्याचा फिर्यादीचा आरोप आहे.
मार्च 2025 मध्ये पतीने लंडनला जायचे असल्याने माहेरकडून 10 लाख रूपये आणण्याचा दबाव टाकल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. पैसे न दिल्याचा राग धरून शिवीगाळ तसेच धमक्या दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सततच्या छळाला कंटाळून पीडिताने भरोसा सेलमध्ये तक्रार केली होती. तेथे समजोता अपयशी ठरल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.





