Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखलोकशिक्षणाला प्रभावी प्रचारक मिळतील का?

लोकशिक्षणाला प्रभावी प्रचारक मिळतील का?

सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी लोकशिक्षण अत्यावश्यक आहे हे महाराष्ट्राला लाभलेल्या समाजसुधारक आणि संतांनी ओळखले होते. समाजातील जातीभेद मिटवण्याचे शिवधनुष्य पेलायचे असेल तर आणि अंधश्रद्धांना मुठमाती द्यायची असेल तर लोकजागरणाला पर्याय नाही हे भारतीय समाजाचे दुखणे त्यांनी सर्वांनी जाणले होते. समाजसुधारकांनी शैक्षणिक चळवळ उभारली आणि लोकशिक्षणाचा पाया घातला. संतांनी रचलेले अभंग, भारुड आणि भजने लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम बनवण्याचे कसब त्या मंडळींनी आत्मसात केले. संत गाडगेबाबांनी झाडूच्या मदतीने सामाजिक क्रांती घडवली. डॉ.अभय आणि राणी बंग यांची ‘सर्च’ संस्था, बाबा आमटे यांचे आनंदवन अशा अनेक सामाजिक संस्था आणि मेळघाटात काम करणारे डॉ.रवीन्द्र आणि स्मिता कोल्हे यांच्यासारखे कार्यकर्ते निरलस वृत्तीने लोकशिक्षणाचा हाच वसा पुढे चालवत आहेत. तथापि समाजात कोणतेही चांगले बदल संथगतीनेच प्रभाव दाखवतात. हेही त्या संतांनी आणि समाजसुधारकांनी ओळखले होते. लोकशिक्षणाच्या चळवळीला आव्हान देणार्‍या घटनाही घडतात. अशा घटना संवेदनशील माणसांना विषण्ण करतात. कधीकाळी समाजाला फसवणारे ‘भोंदू बाबा’हे एकमेव नाव माहित होते. आता त्यात कालानुरुप नवी नावे सामील झाली आहेत. त्यांचे फसवणुकीचे प्रकारही वेगवेगळे. कधी पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातला जातो. भुताचा नायनाट करण्यासाठी काही बाबा लाखोंच्या संख्येत पैसे वसूल करतात. तर कधी, भुताने पछाडल्याचे सांगून बाबाबुवा मुलींना त्यांच्या आश्रमात ठेवायला मुलींच्या पालकांना भाग पाडतात आणि बलात्काराच्या गुन्ह्यात मोठी भर पडू लागते. नुकतीच नागपुरमध्ये अशी एक घटना उघडकीस आली. एका अल्पवयीन मुलीवर दोन भोंदूबाबांनी अत्याचार केल्याचे वृत्त माध्यमात झळकले आहे. संबंधित मुलगी आजारी होती. तिच्यावर गंडेदोर्‍याचे उपचार करण्यासाठी तिचा मामाच तिला भोंदूबाबांकडे सोडून गेला होता. धुळे जिल्ह्यातील फतेपूर येथील एका 8 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात जटा झाल्या. त्या काढल्या तर मुलाच्या जीवाला धोका उत्पन्न होईल असा धाक एका तथाकथित बाबाने त्याच्या पालकांना घातला. जालना येथे एक अवैध दवाखाना चालवला जात होता. त्या दवाखान्यावर छापा टाकण्यात आला. तेव्हा तिथे अवैध गर्भपाताचे केंद्र चालवले जात असल्याचे उघड झाले. कर्‍हाड तालुक्यातील कुसुर गावातील एका मुलीची तिच्या जन्मदात्यांनीच हत्या केली. भावकीतील मुलावर तिचे प्रेम होते. त्या मुलाशीच लग्न करण्याचा हट्ट तिने धरला होता. याचा संताप आईवडिलांना अनावर झाला आणि त्यांनी तिचा खून केला. या व अशा अनेक घटना लोकशिक्षणाची नितांत गरज अधोरेखित करतात. तथाकथित भोंदू बाबा-बुवा-महाराजांमध्ये आता नव्याने भोंगेबाबा तर काही भुंगेबाबा अशा नव्यानव्या जमातींची भर पडत आहे. मुली व महिलांवर भोंदूबाबांनी अत्याचार केल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. तरीही मुलींचे नातेवाईक मुलींना बाबाबुवांच्या आश्रमात कसे पाठवतात? एकटीला ठेऊन जायची हिंमत कशी करतात? मुलीसोबत विपरित घटना घडण्याची जराही शंका त्यांना येत नसावी का? जातीभेद नष्ट करण्यासाठी समाजसुधारक आणि संतांनी अविरत प्रयत्न केले. तरी एकविसाव्या शतकात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही मुलीच्या आईवडिलांना मुलीच्या जीवापेक्षा जातीचा अभिमान मोलाचा का वाटतो? आणि मुलगी जन्माला येण्याआधीच गर्भाच्या गळ्याला नख लावणारांविषयी कोणी काय बोलावे? मुलगाच हवा याचा अट्टाहास धरण्याचे गंभीर सामाजिक परिणाम अनुभवास येत आहे. मुलांना विवाहासाठी मुलीच मिळेनाशा होत आहेत. तरीही अवैध गर्भपाताचा धंदा भरभराटतोच आहेत. अशा घटना माणसाच्या तर्कशक्तीला आणि बुद्धीलाच जशा आव्हान देतात. तशीच लोकशिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे हेही पटवून देतात. माणसातले माणुसपणच अशा घटनांमध्ये पणाला लागत असताना राजकीय भोंग्यांना मात्र याच्याशी काही देणेघेणे नसावे अशी शंका सद्यस्थितीवरुन येते. तात्पयर्र्, समाजाला कितीतर्‍हेने विचार करायला शिकावे लागणार आहे. लोकशिक्षणाची खास गरज दिवसेदिवस वाढतच आहे. त्याची जबाबदारी जाणते आणि विचारवंत स्वीकारतील का?

- Advertisment -

ताज्या बातम्या