Saturday, September 14, 2024
Homeनाशिककठपुतली खेळाला गणेशोत्सवात मिळतोय नाशकात प्रतिसाद

कठपुतली खेळाला गणेशोत्सवात मिळतोय नाशकात प्रतिसाद

सारिका पूरकर-गुजराथी

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी

गणेशोत्सवात विविध मंडळे देखाव्यांसाठी चढाओढ दिसत असतानाच भद्रकाली व मुंबई नाका परिसरात मात्र कठपुतलीचा खेळ पाहण्यासाठीही तितकीच गर्दी करताना नाशिककर दिसत आहेत. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या, मुळची राजस्थानची लोककलेला म्हणनू प्रसिद्ध असलेली कठपुतली खेळ ही लोककला आता मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली असून आजही तितकीच लोकप्रिय आहे, हे गणेशोत्सवात या खेळाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अधोरेखित झाले आहे.

गणशोत्सवात मागणी असेल त्या मंडळासाठी कठपुतली खेळ दहा दिवस सादर केले जातात. नाशकात भद्रकाली परिसरात हे खेळ सादर करण्यासाठी हे कलाकार नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. साधारण १०-१५ जणांची त्यांच्या एका टीमसह ते नाशकात वास्तव्यास आहेत. गणेशोत्सवातील दहाही दिवस त्यांना भाड्याने रुम घेऊन, जागा घेऊनच हे कलाकार राहत आहेत. १०-१५ जणांचा दररोजचा खर्च मंडळाच्या सहकार्याने ते भागवत आहेत. सध्या पावसामुळे त्यांच्या खेळात काही वेळेस व्यत्यंय येत असला तरी नागरिकांचा प्रतिसाद त्यांचा उत्साह वाढवत आहे.

नेमकी कशी बनते कठपुतली?

कठपुतलीतील पुतली या शब्दाचा अर्थ असतो बाहुली. थोडक्यात हा बाहुल्यांचाच खेळ. कठपुतली म्हणजेच ही बाहुली लाकूड कोरुन तयार केली जाते. आंब्याच्या झाडाचे लाकूड मऊ असते, ते कोरायला सोपे जाते म्हणून त्या झाडाच्या लाकडावरच कठपुतलीचा चेहरा सुतारकामातील विविध हत्यारे वापरून कोरला जातो. त्यचाबरोबर शिसमाचे लाकूडही कठपुतली तयार करण्यासाठी वापरले जाते.

तसेच वॉशेबल कॉटन ( कापूस ) वापरुन कठपुतलीचे धड म्हणजेच, तिचे शरीर, हात,पाय बनवले जातात. याला मग कठपुतलीची मान,चेहरा जोडला जातो. कठपुतलीच्या प्रत्येक अवयवातून मग धागा सुईच्या सहाय्याने ओवला जातो. हा धागा मजबूत असणे गरजेचे असते. कारण तिला नाचवायचे असते, त्यादरम्यान तो तुटता कामा नये म्हणून मोचीवाला धागा म्हणजेच चांभारकामासाठी, चप्पल. बुट शिवण्यासाठी जो धागा वापरतात तो कठपुतलीच्या शरीरात ओवला जातो. कठपुतली ही पुरुष, स्त्रीभूषेत असते. म्हणून मग त्यानुसार तिचे कपडे शिवले जातात. चेहरे रंगविले जातात. त्यांना आवश्यक ती ज्वेलरी घातली जाते.

कसा केला जातो कठपुतलीचा खेळ?

कठपुतलीचा खेळ हा मनोरंजनासाठी केला जात असल्यामुळे कठपुतलीचे नृत्य लोकप्रिय आहे. कठपुतलीची गाणी देखील बॉलिवूडपासून प्रेरणा घेत आहेत. काही नृत्य बॉलिवूडमधील लोकप्रिय गाण्यांवर तयार केली जातात. तर काही नृत्य लावणीसारख्या लोकगीतांवर केली जातात.

गाण्याचा ठेका हाच कठपुतलीच्या खेळाचा आत्मा आहेे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ठसकेबाज गाणी त्यासाठीच या खेळासाठी वापरली जातात. वेगाने हालचाली, जोशात नृत्य करणारी कठपुतली पाहणे प्रेक्षकांना आवडते. त्यामुळे कठपुतली खेळासाठी गाण्याची निवड ही त्यादृष्टीने करावी लागते. आजा नच ले, ढोल बाजे, डोला रे, निंबुडा निंबुडा, चंद्रा, आप के आ जाने से अशी गाणी या खेळासाठी निवडली जातात.

हात आणि नजरेची करामत

कठपुतली नाचवणे ही करामत तुमची नजर आणि हातावर अवलंबून असते. कारण काही कठपुतली पाच धागे, काही दहा धागे, काही पंधरा धाग्यांची असते. हे सगळे धागे हातात पकडून ठेवावे लागतात. उजव्या, डाव्या हातात धागे पकडून आम्ही ही कठपुतली नाचवत असतो.

शिवाय ज्या गाण्यावर कठपुतली नाचवयाची असते, त्या गाण्याची कोरिओग्राफी या कलाकारांना कोणी शिकवत नाही तर त्या गाण्यातील कठपुतलीच्या स्टेप्सही हे कलाकार ठरवतात, डिझाईन करतात गाण्यातील कोणत्या ठेक्याला, कठपुतलीचा कोणता धागा वर उचलला गेल्यावर कोणती स्टेप तयार होईल याचे गणित या कलाकारांनाच कळते.

त्यानुसार संपूर्ण डान्स तयार होत असतो. प्रत्यक्ष शो करायची वेळ येते तेव्हा या कलाकारांची सगळी नजर त्या धाग्यांवर असते. गाण्याच्या त्या बीटला तो तो धागा त्या क्षणालाच उचलला जाईल यासाठी त्यांना खूप दक्ष राहावे लागते. त्या त्या क्षणाला , स्टेपला धागा वर खेचला गेला नाही तर सगळा शो खराब होण्याची भीती असते.

वर्षभर सातत्याने कठपुतली खेळ

टीव्ही, सिनेमागृह नव्हते त्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणून कठपुतली खेळ राजस्थानधील गावोगावी होत असत. मात्र आता आय फोन, डिश टीव्ही, होम थिएटर, फाईव्ह जी या तत्रज्ञानाने भारावलेल्या युगातही कठपुतली खेळ हा तितकाच नाही तर किंबहुना नव्याने लोकप्रिय झाला आहे.

युवा पिढीच्या सक्रिय सहभागामुळे आधुनिक भाषेत पपेट शो म्हणून कठपुतली ओळखली जाऊ लागली आहे. कठपुतली खेळ ही राजस्थानची लोककला म्हणून जगभरात परिचीत आहे. संपूर्ण राजस्थान, राजस्थानातील प्रत्येक परिवारातील एक तरी सदस्य आजही कठपुतली परंपरेला जोडला गेलेला असून कठपुतली खेळाला नवे ग्लॅमर प्राप्त करुन देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

दुबईत दर सहा महिन्यांनी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील महोत्सवात कठपुतलीचे १०० हून अधिक खेळ हे कलाकार करीत असतात. तसेच राजस्थानातील प्रत्येक हॉटेलमध्ये हे शो वर्षभर सुरुच असतात. जगभरातील पर्यटक राजस्थानातील जयंपूर, जोधपूर या शहरांमध्ये वर्षभर येतात, त्यांच्यासाठी कठपुतली खेळ मोठ्या संख्येने आजही होतात.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या